CoronaVirus : ...अन् महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 10:35 AM2020-04-05T10:35:35+5:302020-04-05T10:36:56+5:30
Coronavirus : गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे १.७० लाख कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
समस्तीपूर : कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा डॉकडाऊन सुरु आहे. दरम्यान या लॉकडाऊनमुळे देशातील गरीब जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे १.७० लाख कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, आता केंद्र सरकार आता २० कोटी महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करत आहे. बिहारमधील समस्तीपूर येथील जनधन बँक खातेधारक महिला केंद्र सरकारकडून मिळालेले पैसे काढण्यासाठी पोहोचल्या होत्या.
समस्तीपूरमध्ये खाते नंबरच्या शेवटच्या अंकानुसार जनधनशी संबंधित महिलांच्या मोबाइलवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे मिळणारे ५०० रुपये जमा होत आहेत. त्यामुळे जनधन खात्यात जमा होणारे पैसे काढल्यानंतर समस्तीपूरमध्ये महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. तसेच, या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
दरम्यान, देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, प्रत्येक महिलेच्या जनधन बँक खात्यात दर महिना ५०० रुपये जमा होतील. ही प्रक्रिया तीन महिन्यापर्यंत चालू राहील. म्हणजेच, केंद्र सरकार महिलांच्या बँक खात्यात तीन महिन्यांत १५०० रुपये जमा करणार आहे. एकूण जनधन खात्यांपैकी ५३ टक्के महिलांच्या नावे आहे. त्यानुसार, जवळपास २० कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे.
याचबरोबर, सोशल डिस्टेंसिंग लक्ष्यात घेऊन सर्वांना एकाचवेळी पैसे ट्रान्सफर करण्यात येत नाहीत. ज्या महिलांच्या जनधन बँक खाते क्रमांकातील शेवटचा अंक ०-१ आहे, त्यांच्या खात्यात ३ एप्रिलला आणि २-३ अंक असणाऱ्या धातेखारकांच्या बँक खात्यात ४ एप्रिलला पैसे जमा झाले आहेत. तसेच, ज्या लाभार्थींचा खाते क्रमांक ४-५ आहे, त्यांच्या खात्यात ७ एप्रिलला आणि ६-७ क्रमांकाच्या खात्यात ८ एप्रिल आणि ८-९ क्रमांक येणाऱ्या खातेधारकांच्या बँक खात्यात ९ एप्रिलला पैसे जमा होणार आहेत.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात ३ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.