Coronavirus: पंतप्रधानांच्या आवाहनाला संघ प्रतिसाद देणार, 'जनता कर्फ्यू' पाळणार, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 05:14 PM2020-03-21T17:14:13+5:302020-03-21T20:19:43+5:30
Coronavirus: जनता कर्फ्यूला संघाची बगल; उद्या होणाऱ्या शाखेच्या वेळात बदल
नागपूर: कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालीय. शाळा, महाविद्यालयं, ट्रेन, मेट्रो, मॉल, बाजारपेठा, धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या (२२ मार्चला) जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. सकाळी ७ ते रात्री ९ असे १४ तास जनता कर्फ्यू पाळला जावा, असं मोदींनी म्हटलंय. मात्र या दिवशीदेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुरूच राहणार आहेत. उद्या संघाच्या शाखांची वेळ बदलण्यात येईल, अशी माहिती संघानं ट्विटरवरुन दिलीय.
रविवारी होऊ घातलेला जनता कर्फ्यू पाहता, सकाळी साडे सहाच्या आधी किंवा रात्री साडे नऊच्या नंतर शाखा सुरू होईल, असं आरएसएसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलंय. संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हवाल्यानं हे ट्विट करण्यात आलंय. 'माननीय पंतप्रधानांचं २२ मार्चचं जनता कर्फ्यूचं आवाहन लक्षात घेता त्या दिवशी शाखा सकाळी साडे सहाच्या आधी किंवा रात्री ९.३० च्या नंतर होतील. आपापल्या विभागात, मोहल्ल्यात किंवा सोसायटीत काही स्वयंसेवक एकत्र येऊन प्रार्थना करू शकतात,' असं संघानं ट्विटमध्ये म्हटलंय.
उद्याच्या शाखा घेत असताना संघ वेळेत बदल करणार आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या वेळेत संघाच्या शाखा होणार नाहीत. मात्र केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत सगळ्यांकडून गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जात असताना संघ शाखा का बंद करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मंदिरं, मशिदीपासून शाळा, महाविद्यालयं, हॉटेल, मॉल्स अशी सगळीच गर्दीची ठिकाणं बंद केली जात असताना संघानंदेखील शाखा बंद करून कोरोनाचा संसर्ग टाळावा, असा एक मतप्रवाह पाहायला मिळतोय.
माननीय प्रधानमंत्री जी के 22मार्च के जनता कर्फ्यु के आवाह्न को ध्यान में रख कर शाखायें उस दिन प्रात:6.30से पहले या रात्रि 9.30बजे के बाद लगेंगी।अपने-अपने क्षेत्र,मोहल्ला या सोसायटी में सुविधानुसार कुछ स्वयंसेवक एकत्र होकर भी प्रार्थना कर सकते हैं।-सरकार्यवाह, सुरेश (भय्याजी) जोशी pic.twitter.com/J5PBJcRQv7
— RSS (@RSSorg) March 21, 2020
गुरुवारी (१९ मार्चला) पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन देशवासीयांना केलं. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी जनता जनतेसाठी स्वयंस्फूर्तीनं कर्फ्यू पाळेल, असं मोदी म्हणाले होते. त्यावेळी संघानं पंतप्रधानांच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात येईल, असंदेखील संघानं म्हटलं होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदींनी केलेल्या आवाहनाला संघाचा पाठिंबा असेल. संघाचे स्वयंसेवक संकल्प आणि संयम या मंत्रानुसार २२ मार्चला योगदान देतील, असं संघानं आधी म्हटलं होतं.