coronavirus: कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 10:00 AM2020-05-23T10:00:13+5:302020-05-23T11:16:39+5:30
देशातील काही राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. या राज्यांमध्ये आता दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहे.
गंगटोक - देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असताना काही मोजकी राज्ये मात्र कोरोनाच्या प्रकोपापासून बचावली आहे. त्यापैकी काही राज्यांत कोरोनाचे अत्यल्प रुग्ण सापडले आहेत, तर काही राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. या राज्यांमध्ये आता दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहे. आता कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या सिक्कीममध्ये आता शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत.
राज्यातील शाळा आणि महाविद्यालये १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय सिक्कीम सरकारने घेतला आहे. सिक्कीममध्ये नववी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहे. कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर बंद झालेल्या शिक्षणसंस्था सुरू करणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना राज्याचे शिक्षणमंत्री कुंगा नीमा लेपचा यांनी सांगितले की, ‘’आम्ही राज्यातील शाळा आणि महाविद्यालये १५ जूनपासून सुरू करत आहोत. हा निर्णय बोर्डाच्या परीक्षा आणि वरच्या वर्गातील अभ्यासक्रमाचे महत्त्व विचारात घेऊन घेतला आहे. आम्ही नववी ते १२ चे वर्ग सुरू करणार आहोत. मात्र नर्सरी ते आठवी पर्यंतचे वर्ग बंद राहतील. सोशल डिस्टंसिंग विचारात घेऊन शाळेत सकाळची प्रार्थना होणार नाही. तसेच आठवीपर्यंतचे वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष
कोलकाता विमानतळ पाण्याखाली, वादळी वाऱ्यांनी महाकाय विमानेही हादरली
इतर वर्गांसाठीचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. तसेच सिक्कीममधील वार्षिक परीक्षा २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत टाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे अभ्यासावर अधिक लक्ष देता येईल. तसेच कॉलेज आणि विद्यापीठांचे कामकाज दोन सत्रांत चालेल. यादरम्यान, सोशल डिस्टंसिंग आणि अन्य संरक्षण विषयक नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल.