CoronaVirus News: कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या चाचणीला आरंभ; पहिल्या चाचणीचे दिसले नाहीत दुष्परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:14 AM2020-08-12T04:14:03+5:302020-08-12T04:14:12+5:30
नागपुरातील गल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका महिलेसह सात जणांना लसीचा डोस
नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा डोस मंगळवारी नागपुरातील गल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका महिलेसह सात जणांना देण्यात आला.
पहिल्या चाचणीनंतर त्यांच्यामध्ये गेल्या १४ दिवसांत कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत, दुसरा डोस देण्यापूर्वी संबंधितांचे रक्ताचे नमुने घेऊन ते दिल्लीला पाठविले जात आहे. यामध्ये किती अॅन्टिबॉडीज वाढल्या ते तपासले जाणार आहे. २८ आणि ४२ दिवसांनी पुन्हा रक्ताची तपासणी केली जाईल. त्यानंतरच लसीच्या प्रभावाच्या निष्कर्षावर जाता येईल, असे हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी सांगितले.
भारत बायोटेकने तयार केलेल्या या लसीची चाचणी देशात १२ सेंटरवर सुरू आहे. गिल्लूरकर हॉस्पिटलने पहिला डोस ५५ व्यक्तींना २७ ते ३१ जुलै या कालावधीत दिला. सर्वाधिक व्यक्तींना डोस देणारे हे देशातील दुसरे हॉस्पिटल ठरले.
विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने सर्वात आधी या मानवी चाचणीला प्रसिद्धी दिली. सोबतच कोरोनाला हरविण्यासाठी 'कोव्हॅक्सिन वॉरियर्स’ होण्याचे आवाहन केले होते. यामुळे १०० वर वॉरियर्स पुढे आले.