कोविडची दुसरी लाट : ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती, महागाई वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:45 AM2021-05-13T08:45:56+5:302021-05-13T08:46:21+5:30
सेन यांनी सांगितले की, भारताला अन्नधान्यांची आयातही करावी लागू शकते. त्याचा जागतिक बाजारातील धान्याच्या किमतीवर परिणाम होईल. कारण या समस्येचा सामना करणारे आपण जगात एकटे नाही आहोत.
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागात साथीचा प्रसार खूपच व्यापक आहे. याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला दोन पातळ्यांवर फटका बसू शकतो. एक म्हणजे प्राथमिक मंडयांच्या पातळीवर वितरण साखळी विस्कळीत होऊन अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम म्हणून खाद्य क्षेत्रातील महागाई वाढण्याचा धोका आहे. दुसरी बाब म्हणजे, यंदा ग्रामीण रोजगाराची हमी देणाऱ्या मनरेगा योजनेवर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मागणी घटून अर्थव्यवस्थेची मोठी हानी होऊ शकते.
सेन यांनी सांगितले की, भारताला अन्नधान्यांची आयातही करावी लागू शकते. त्याचा जागतिक बाजारातील धान्याच्या किमतीवर परिणाम होईल. कारण या समस्येचा सामना करणारे आपण जगात एकटे नाही आहोत.
सर्वच विकसनशील देशांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. गेल्या वर्षीच्या साथीत ग्रामीण अर्थव्यवस्थेने देशाला तारले होते. यंदा ग्रामीण भागच नेमका अधिक संकटात आहे, असे जाणकारांनी म्हटले आहे.
मनरेगा कामांची मागणी घटू शकते
भारताचे माजी मुख्य सांख्यिकीविद प्रणब सेन यांनी सांगितले की, यंदाच्या साथीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य हे आहे की, ती ग्रामीण भागात वेगाने पसरत आहे. त्यामुळे ग्रामीण पुरवठा साखळी फारच आधीच्या पातळीवर विस्कळीत होताना दिसत आहे. त्याचा शेती उत्पादनावर परिणाम होणे अटळ आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्यामुळे यंदा मनरेगाच्या कामांची मागणी घटू शकते. त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या मागणीवर होईल.