Coronavirus: ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 02:21 PM2021-05-21T14:21:07+5:302021-05-21T14:21:40+5:30
Sunderlal Bahuguna passes away: चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन झालं आहे. त्यांनी ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
ऋषिकेश - चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन झालं आहे. त्यांनी ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोनासह अन्य आजारांमुळे ग्रस्त झाल्याने त्यांना ८ मे रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Coronavirus in India) उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पर्वतीय भागात जल, जंगल आणि जमिनीच्या प्रश्नाबाबत प्राधान्याने लढणारे आणि जनतेला त्यांचा हक्क मिळवून देणाऱ्या बहुगुणा यांचे योगदान सदैव लक्षात राहील, असे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. ( Senior environmentalist leader Sunderlal Bahuguna passes away)
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये तीरथसिंह रावत म्हणाले की, चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि जगभरात वृक्षमित्र या नावाने प्रसिद्ध झालेले पर्यावरणवादी पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाची अत्यंत दु:खदायी बातमी मिळाली आहे. त्यांच्या जाण्यामुळे केवळ उत्तराखंडच नाही तर संपूर्ण देशाची हानी झाली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना १९८६ मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार आणि २००९ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सत्मानित करण्यात आले होते. पर्यावरण संरक्षणाच्या मैदानामध्ये सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
गेल्या महिन्यात उत्तराखंडमध्ये कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला होता. दरम्यान, सुंदरलाल बहुगुणा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. रुग्णालयात दाखल होण्याआधी एक आठवडाभर त्यांना ताप येत होता. देहराडूनमधील एका खासगी लॅबमध्ये चाचणी केल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.