Coronavirus: तुमची लाज वाटते... युवराज सिंग अन् भज्जीवर भडकले नेटीझन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 11:45 AM2020-04-01T11:45:14+5:302020-04-01T11:53:30+5:30
भज्जी आणि युवी यांनी शाहिद आफ्रिदी करत असलेल्या समाजकार्यात हातभार लावण्याचं आवाहनही लोकांना केलं आहे. त्यामुळेच, नेटीझन्स युवी अन् भज्जीवर संतापले आहेत
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमध्येही काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहेत. अशात गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुढे आला आहे. त्याच्या या समाजकार्याला भारताचे क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. भज्जी अ्न युवीच्या या प्रतिक्रियेनंतर ट्विटर युजर्संनने त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. ट्विटरवर सध्या #ShameonYuviBhajji हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
भज्जी आणि युवी यांनी शाहिद आफ्रिदी करत असलेल्या समाजकार्यात हातभार लावण्याचं आवाहनही लोकांना केलं आहे. त्यामुळेच, नेटीझन्स युवी अन् भज्जीवर संतापले आहेत. कोरोना व्हायरससाठी जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी आपापल्या परीनं या समाजकार्यात हातभार लावताना दिसत आहेत. शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशननं आतापर्यंत पाकिस्तानातील दोनशेहून अधिक गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम केलं आहे. त्याच्या या समाजकार्याचं भज्जी आणि युवी यांनी कौतुक केलं आहे.
युवीनं ट्विट केलं की,''हा कसोटीचा काळ आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांची काळजी आपल्याला घ्यायची आहे. चला तर मग योगदान करूया.... मी शाहिद आफ्रिदी आणि त्याच्या फाऊंडेशनच्या समाजकार्याला सपोर्ट करतो. तुम्हीही त्याच्या समाजकार्यात मदत करा, असं आवाहनही करतो.''
यापूर्वी हरभजन सिंगनेही ट्विट करून आफ्रिदीला पाठिंबा दिला. त्यानं लिहिलं की,'' शाहिद आफ्रिदी आणि त्याचं फाऊंडेशन चांगलं काम करत आहेत. त्याच्या कार्यात आपणही हातभार लावूया आणि जमेल तशी मदत करूया...' दरम्यान, युवी आणि भज्जीच्या पाठिंब्याचे आफ्रिदीनंही कौतुक केलं. तो म्हणाला,'तुमच्या सहकार्याबद्दल दोघांचेही आभार... तुमच्या या प्रेमानं शांततेचा संदेश दोन्ही देशांना दिला आहे.'
देशातील नेटीझन्सला हा भारत-पाकिस्तान संवाद खटकल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये हिंदुंना रेशन दुकानाचा माल नाकारण्यात आला होता, तेव्हा कुठे होतात आपण, असा प्रश्न काही ट्विटर युजर्संने या दोन्ही माजी खेळाडूंना विचारला आहे.