CoronaVirus: धक्कादायक! नौदलाच्या ३0 कर्मचाऱ्यांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:13 AM2020-06-26T04:13:23+5:302020-06-26T04:13:35+5:30
काहींना क्वारंटाइनमध्ये ठेवून त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत, तर काहींना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
रामनाथपूरम : भारतीय नौदलाच्या आयएनएस पुरुंदू या हवाई तळावरील तब्बल ३0 जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील काहींना क्वारंटाइनमध्ये ठेवून त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत, तर काहींना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. अर्थात, याचा आयएनएस पुरुंदूच्या कामकाजावर काहीही परिणाम झालेला नाही, असे संरक्षण दलाच्या चेन्नईतील अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने ३0 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले आहे, तर नौदलाने काही जणांना बाधा झाल्याचे नमूद केले आहे. हे सर्व जण अलीकडेच या हवाई तळावर रुजू झाले होते. या प्रकारानंतर आयएनएस पुरुंदूचे सॅनिटायझेशन ताबडतोबीने सुरू करण्यात आले आहे. तेथील सर्वच जणांच्या चाचण्या करण्याची गरज आहे का, हा विचार सुरू आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्व भागावर आयएनएस पुरुंदूवरून लक्ष ठेवले जाते. सागरी सीमांचे रक्षण, समुद्रातील हालचाली आणि गुप्त माहिती मिळवून त्यांचे विश्लेषण हे काम तिथे केले जाते. (वृत्तसंस्था)
>१२ जवानांनाही बाधा
कोहिमा : भारतीय लष्कराच्या १२ जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी आढळून आले. नागालँडमधील जाखमा लष्करी तळावरील हे जवान आहेत. याच तळावरील तीन जवानांना या महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. या सर्वांना लष्कराच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह असले, तरी त्यांच्यात या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. हे जवान कोणाकोणाच्या संपर्कात आले होते, याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे.