Coronavirus: धक्कादायक! उत्तर प्रदेशातील एकाच कुटुंबात १३ जणांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 04:27 PM2020-04-14T16:27:19+5:302020-04-14T16:27:51+5:30
आग्रा येथे आढळणाऱ्या रुग्णांमध्ये एका कुटुंबातील १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
लखनऊ – उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत ६४४ पर्यंत वाढ झाली आहे. सोमवारी कोरोना संक्रमित १४८ रुग्ण आढळून आले. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ३ महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. या मुलीवर बस्ती येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी सर्वाधिक ३९ कोरोना रुग्ण आग्रा येथे आढळून आले.
आग्रा येथे आढळणाऱ्या रुग्णांमध्ये एका कुटुंबातील १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. आग्रा येथील फतेहपुरी परिसरात एका गाइडच्या कुटुंबात गाइडसह १३ लोकांना कोरोनाची लागण झाली. तर सहारनपूर येथे आई-मुलासह २४ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. गौतमबुद्ध नगरमधून १६ आणि मुरादाबाद येथून १७ कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ४९ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत.
उत्तर प्रदेशात सोमवारी ९४६ लोक चीनमधून किंवा इतर देशात प्रवास करून परत आले आहेत. ते सध्या रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या देखरेखीखाली आहेत. आतापर्यंत अशा ७० हजार १०८ लोकांची ओळख पटली आहे. या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे.
आतापर्यंत १२ हजार ५४२ रिपोर्ट निगेटिव्ह
उत्तर प्रदेशातील आतापर्यंत १३ हजार २८७ संशयितांचे नमुने लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत, त्यापैकी १२ हजार ५४२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संभाव्य १७७ रुग्णांचे अहवाल अजून आले नाहीत. पश्चिम उत्तर प्रदेश वगळता राज्यातील अन्य काही विभागांची परिस्थिती सुधारली आहे.