Coronavirus: धक्कादायक! सीरमच्या 'कोविशिल्ड'मुळे स्वयंसेवकाच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 01:26 AM2020-11-30T01:26:19+5:302020-11-30T07:08:32+5:30
९३.७१ टक्के प्रमाण, ४८,८१० नवे रुग्ण, कोविशिल्ड या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांत स्वयंसेवक म्हणून सहभागी झालेल्या चेन्नईतील एका व्यक्तीच्या (वय ४० वर्षे) मज्जासंस्था व मेंदूच्या कार्यावर या लसीमुळे विपरित परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे
नवी दिल्ली : देशातील २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतल्या कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा राष्ट्रीय स्तरावरील १.४६ टक्के मृत्यूदरापेक्षा कमी आहे. कोरोनाच्या आजारातून ८८ लाखांहून अधिक लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९३.७१ टक्के आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९३ लाख ९२ हजार झाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९३,९२,९१९, तर बरे झालेल्यांचा आकडा ८८,०२,२६७ झाला आहे. रविवारी कोरोनाचे ४८,८१० नवे रुग्ण आढळून आले. आणखी ४९६ जण या संसर्गाने मरण पावल्याने बळींची एकूण संख्या १,३६,६९६ झाली आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सलग १९ व्या दिवशीही पाच लाखांपेक्षा कमी म्हणजे ४,५३,९५६ इतकी होती.
जगभरात कोरोनाचे ६ कोटी २६ लाखांहून अधिक रुग्ण असून, त्यातील ४ कोटी ३२ लाख जण बरे झाले आहेत, तर १४ लाख ५८ हजार लोक मरण पावले. अमेरिकेत १ कोटी ३६ लाख रुग्णांपैकी ८० लाख ४१ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
नाताळपर्यंत कोरोना संसर्ग निवळण्याची आशा
युरोपमधील अनेक देशांत अतिशय कडक स्वरूपाचा लॉकडाऊन लागू केल्यामुळे तिथे नाताळपर्यंत कोरोनाचा फैलाव खूप कमी होईल, अशी आशा या देशांना आहे. युरोपीय देशांमधील कोरोना बळींचा आकडा आता ४ लाखांपेक्षा जास्त झाला आहे.
कोविशिल्डमुळे स्वयंसेवकाच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्याचा दावा
कोविशिल्ड या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांत स्वयंसेवक म्हणून सहभागी झालेल्या चेन्नईतील एका व्यक्तीच्या (वय ४० वर्षे) मज्जासंस्था व मेंदूच्या कार्यावर या लसीमुळे विपरित परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या व्यक्तीने पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सिरम इन्स्टिट्यूट व या लसीच्या प्रयोगांशी संबंधित अन्य संस्थांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.या व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. कोविशिल्ड ही लस सुरक्षित नसून तिच्या चाचण्या, उत्पादन व वितरणासाठी दिलेली परवानगी रद्द करावी ही मागणी मान्य न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या नोटिसमध्ये देण्यात आला आहे.
अस्ट्राझेनेका, ऑक्सफर्ड विद्यापीठ कोविशिल्ड लस विकसित करत असून या प्रकल्पात सिरम इन्स्टिट्यूटही महत्वाची भूमिका बजावत आहे. कोविशिल्डच्या प्रयोगाशी संबंधित असलेली इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ
हायर एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थांनाही ही नोटीस पाठविण्यात आली आहे. कोविशिल्ड लस बनविणाऱ्यांकडून तिच्या दुष्परिणामांबाबतची माहिती दडपली जात आहे असा दावा या कायदेशीर नोटिसीत करण्यात आला आहे. चेन्नईतील व्यक्तीला १ ऑक्टोबरला कोविशिल्ड लस टोचण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांत आपल्याला अनेक दुष्परिणाम जाणवू लागले असा त्याचा दावा आहे.