coronavirus: धडकी भरवणारी आकडेवारी, जगातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४० टक्के रुग्ण सापडताहेत भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 08:19 AM2020-09-08T08:19:50+5:302020-09-08T08:21:49+5:30
तसेच भारतानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांमध्ये सापडलेल्या नव्या रुग्णांची एकत्रित आकडेवारीही भारतापेक्षा कमी आहे.
नवी दिल्ली -कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे. देशात सापडणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, रविवारी जगभरात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ४० टक्के रुग्ण एकट्या भारतात सापडले आहेत. तसेच भारतानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांमध्ये सापडलेल्या नव्या रुग्णांची एकत्रित आकडेवारीही भारतापेक्षा कमी आहे.
दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी देशात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटून ७४ हजार ९६० झाली आहे. मात्र सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढून ११२५ झाली. देशात एका दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत.
देशात आतापर्यंत कोरोनामुळे ७२ हजार ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी भारतात तब्बल ९४ हजार रुग्ण सापडले होते. तर शनिवारीसुद्धा देशात जवळपास एवढेच रुग्ण सापडले होते. याचा अर्थ सरलेल्या आठवड्याच्या अखेरीस भारतात सुमारे १ लाख ८४ हजार नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.
वर्ल्डोमीटर संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात अमेरिकेमध्ये एकूण ७३ हजार २०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. तर ब्राझीलमध्ये हा आकडा ४५ हजार ८०२ एवढा होता. दोन्ही देशांमध्ये पूर्ण आठवड्यात सापडलेल्या नव्या रुग्णांची संख्या पाहिली तर ती १.२ लाख होते. भारतामध्ये सोमवारी ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर एकट्या महाराष्ट्रात ४२३ जणांनी कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतला. हा एका दिवसामधील सर्वाधिक आकडा आहे.
महाराष्ट्राचा विचार केल्यास देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये महाराष्टाची भागीदारी गेल्या आठवड्यात वाढून पहिल्यांदाच २० टक्के झाली आहे. आता राज्याची ही भागीदारी वाढून २१.७ टक्के झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढून ५ लाखांच्या पुढे गेला आहे. तर कर्नाटकमधील कोरोनाबाधितांची संख्याही वाढून ४ लाखांच्या पुढे गेली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या