coronavirus: श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या आता पूर्ण क्षमतेने चालणार, अधिक स्थलांतरित मजुरांची सोय होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:27 AM2020-05-12T05:27:41+5:302020-05-12T05:28:12+5:30
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात परत नेण्यासाठी चालविण्यात येत असलेल्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांमधून यापुढे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी ठरविले.
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात परत नेण्यासाठी चालविण्यात येत असलेल्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांमधून यापुढे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी ठरविले. या कामगारांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी अशी श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी ज्या राज्यासाठी सोडली असेल त्या राज्यात अंतिम गंतव्य स्थानाखेरीज आणखी तीन ठिकाणी थांबविण्याची सोयही रेल्वेने केली आहे.
या विशेष रेल्वेगाड्या प्रत्येकी २४ डब्यांच्या आहेत. प्रत्येक डब्यात ७२ बर्थ असतात. म्हणजे प्रत्येक गाडीची प्रवासीक्षमता सुमारे १,७२८ एवढी असते. परंतु आधी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळण्यासाठी सर्व मधील बर्थ रिकामे ठेवले जात होते. त्यामुळे एका गाडीने जास्तीत जास्त १,२०० प्रवासी प्रवास करू शकत होते. मात्र आता मधले बर्थ रिकामे ठेवण्यात येणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक विशेष गाडीने आता सुमारे ५०० अधिक असे एकूण १,७०० प्रवासी जाऊ शकतील.
आधी या गाड्या ‘पॉइंट टू पॉइंट’ पद्धतीने चालविल्या जायच्या. म्हणजे सुटली की मध्ये कुठेही न थांबता थेट गंतव्यस्थानी जायची. परंतु तेथून पुन्हा आपापल्या जिल्ह्यांत पोहोचण्यासाठी या मजुरांना अडचणी यायच्या. हे लक्षात घेऊन आता या गाड्या संबंधित राज्यात एकूण चार ठिकाणी थांबतील.
आतापर्यंत पाच लाख मजुरांना लाभ
राज्यांच्या मागणीनुसार दररोज अशा ३०० विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालविण्याची रेल्वेने तयारी ठेवली आहे. अशा प्रकारे घरी परतू इच्छिणाऱ्या सर्व परप्रांतीय स्थलांतरित मजुरांना, पुढील आठ-दहा दिवसांत, त्यांच्या राज्यात परतणे शक्य होईल, अशी रेल्वेची अपेक्षा आहे. १ मे रोजी अशा विशेष गाड्या सुरू केल्यापासून सोमवारपर्यंत ४६८ गाड्यांमधून पाच लाख स्थलांतरित मजूर आपापल्या घरी परत गेले आहेत.
पायी जाणाऱ्यांना थांबवा
विशेष रेल्वेगाड्यांखेरीज अनेक राज्यांनी अन्य राज्यांमधून आपापल्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष बसचीही सोय केली आहे. तरी अशा स्थलांतरित मजुरांचे तांडे महामार्गांवरून व रेल्वे मार्गातून चालत जाताना दिसतात. त्यातून अपघात होऊन गेल्या आठवडाभरात ५०हून
अधिकजण मृत्युमुखी पडले आहेत. कॅबिनेट सचिवांनी शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या घेतलेल्या व्हिडिओ बैठकीत याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली गेली. त्याच अनुषंगाने केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना सोमवारी पत्र पाठवून, त्यांनी आपल्या राज्यातून जास्तीत जास्त श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन केले. तसेच रस्त्याने किंवा रेल्वेमागार्तून चालत जाणाºयांना थांबवून, रेल्वे किंवा बसने त्यांची घरी परतण्याची सोय होईपर्यंत, त्यांना निवारा शिबिरांमध्ये ठेवून तेथे त्यांच्या राहण्याच्या तसेच जेवणाची सोय करावी, असेही राज्यांना सांगण्यात आले.