Coronavirus: भारतातील दोन राज्यांमध्ये कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, संसर्गाच्या वेगाने चिंता वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 10:55 AM2022-04-11T10:55:20+5:302022-04-11T10:56:00+5:30
Coronavirus: भारतातील दोन राज्यातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
नवी दिल्ली - गेली दोन वर्षे देशात धुमाकूळ घालत असलेला कोरोना आता भारतातून संपल्यात जमा असल्याचे चित्र गेल्या काही आठवड्यांमधील आकडेवारीतून दिसत आहे. साप्ताहिक रुग्णसंख्येच्या आकडेवारीतूनही देशातील कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसत आहे. मात्र देशातील दोन राज्यातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. दोन्ही राज्यांत ज्या प्रकारे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे त्यावरून चौथ्या लाटेबाबतची भीती पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू आहे. तसेच दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा हा दीडशेच्या जवळ पोहोचला आहे. दिल्लीमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीमध्ये २६ टक्के तर हरियाणामध्ये ५० टक्के एवढी प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे.
दिल्लीमध्ये रविवारी १४१ रुग्ण नोंदवले गेले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आकडेवारीचा विचार केल्यास दिल्लीमध्ये आठवडाभरात २६ टक्के रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. तिसरी लाट ओसरून संसर्गात घट झाल्यानंतर गेल्या सात दिवसांत ७५१ वरून ९४३ रुग्णांची नोंद झाली आहे. चाचण्यांची संख्या कमी झाल्याने दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा १ टक्क्याच्या वर नोंदवला जात आहे.
दिल्लीसारखीच परिस्थिती हरियाणामध्येही आहे. येथेही कोरोनाच्या रुग्णसंसख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्ली शेजारील राज्य असलेल्या हरियाणामध्येही गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली. हरियाणामध्ये गेल्या आठवड्यातील ३४४ रुग्णांवरून तब्बल ५० टक्क्यांची वाढ होत या आठवड्यात ५१४ रुग्णांची नोंद झाली.
दिल्लीमध्ये १३ जानेवारी रोजी २८ हजार ८६७ रुग्ण सापडले होते. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत घट झाली. दिल्लीमध्ये १४ जानेवारी रोजी संसर्गाचा दर हा ३०.६ टक्के होता. रविवारी दिल्लीत ६११४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली त्यामधील १.३४ पॉझिटिव्ह आले. दरम्यान, भारतामध्ये एका दिवसात कोरोनाचे १ हजार ५४ रुग्ण सापडल्यानंतर देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ही ४ कोटी ३० लाख, ३५ हजार २७१ एवढी झाली आहे. तर २९ जणांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा हा ५ लाख २१ हजार ६८५ वर पोहोचला आहे.