Coronavirus : एक गायिका, पाच पार्टी, कोरोना आणि लॉक डाऊन, कनिका कपूरविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 06:55 AM2020-03-21T06:55:40+5:302020-03-21T06:56:12+5:30
घश्यातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता कनिकाला कोरोनोची लागण झाल्याचा अहवाल आला आणि एकच खळबळ उडाली.
- मनोज राजन त्रिपाठी
लखनौ : केजीएमयू मेडीकल कॉलेजातील फोन खणाणतो. फोनवरून देण्यात आलेली माहिती घबराट निर्माण करणारी होती. बॉलिवडूची गायिक कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाल्याची ही माहिती होती. तातडीने वैद्यकीय पथकाने त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले.
तिच्या घश्यातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता तिला कोरोनोची लागण झाल्याचा अहवाल आला आणि एकच खळबळ उडाली. कारण त्या लखनौत असताना पाचशेहून अधिक व्यक्ती त्यांना भेटल्या होत्या. दरम्यान, कनिका कपूरविरुद्ध निष्काळजीपणा आणि सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सरोजिनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनौच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम २६९, १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
का, कोठे, कसे आणि कधी हे घडले; याचा तपशील ऐकल्यास तुम्हीसुद्धा कचराल आणि कोरोनाचा फैलाव कसा होत आहे, हे कळेल. कनिका कपूर लंडनहून मुंबईमार्गे लखनौ विमानतळावर उतरतात. हे विमान आंतरराष्टÑीय नसल्याने थर्मल स्कॅनिंग झाली नाही. तपासणी होईल, अशी तिला शंका होतीच. त्यामुळे वॉशरूमच्या बहाण्याने गर्दीआडून ती विमानतळाबाहेर आली. १५ मार्च रोजी कनिका कपूर यांचे मित्र आदेश टंडन यांनी पार्टी दिली. या पार्टीला शंभराहून अधिक मान्यवर व्यक्ती होत्या. १५ मार्च रोजी उत्तर प्रदेशचे लोकायुक्त संजय मिश्रा यांच्या घरी होळीची पार्टी झाली. या पार्टीलाही कनिका होत्या.
तीन दिवस पार्ट्यांत सहभाग...
१३ मार्च रोजी बीएसपीचे माजी खासदार अकबर अहमद डंपी यांचे नातेवाईक आदिल यांच्या टिळक मार्गावरील घरात मोठी पार्टी झाली. या पार्टीला कनिकासोबत अनेक प्रतिष्ठीत लोक उपस्थित होते.
१४ मार्च रोजी याच ठिकाणी सिंधिया ओल्ड स्टुडंटन्सच्या नावे पुन्हा एक पार्टी झाली. यावेळी वसुंधरा राजे, त्यांचे पूत्र दुष्यंत, काँग्रेस जितिन प्रसाद, उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह उपस्थित होते. तसेच अधिकारी आणि अन्य नेतेही होते.
अपार्टमेन्टमध्ये दोन दिवस...
१० ते १२ मार्चपर्यंत लखनौ महानगरीतील अपार्टमेंट गॅलेंट येथे वडील रवि कपूर आईसोबत राहिली. यादरम्यान त्यांची अनेक लोकांनी भेट घेतली. १२ मार्च रोजी कनिका कपूर कानपूर येथील मामा विपुल टंडन यांच्याकडे एक दिवस राहिली. १३ मार्च रोजी त्या पुन्हा लखनौतील आपल्या अपार्टमेन्टमध्ये आल्या. १४ मार्च रोजी कनिका लखनौतील ताज हॉटेलमध्ये मुक्कामाला आल्या आणि १६ मार्च रोजी हॉटेल सोडले.
कनिका कपूर तीन पार्टीला उपस्थित होत्या. १५ मार्च रोजीच समाजवादी पार्टीचे माजी खासदार, कोषाध्यक्ष, बिल्डर आणि भाजपचे नेते संजय सेठ यांच्या घरीही मोठी पार्टी झाली. या पार्टीला कनिका गेल्या नव्हत्या.
बाधित गायिकेच्या पार्टीत खासदारही!
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेली गायिका कनिका कपूर हिच्या लखनौमधील पार्टीला उपस्थित राहिलेले लोकसभेतील भाजपचे खासदार दुष्यंतसिंह यांनी नंतर संसदेतही हजेरी लावल्याने सर्व खासदार हबकून गेले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा फैलाव वाढू न देण्यासाठी संसदेचे अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे.
सुमारे १५० खासदार दुष्यंतसिंह यांच्या संपर्कात आले होते. राष्ट्रपती भवनातील चहापानाला दुष्यंतसिंह व राजस्थानचे अनेक खासदारही हजर होते. या घडामोडींवर प्रतिक्रिया देण्यासाठी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी उपलब्ध होऊ शकले नाहीत. कनिका कपूरच्या पार्टीमध्ये गेलेल्या दुष्यंतसिंह यांनी गेल्या सात दिवसांत संसदेसह अनेक ठिकाणी मुक्त संचार केला. त्यांनी अनेकांची गळाभेट घेतली. काही लोकांसह ते जेवले, काहींशी हस्तांदोलनही केले. मात्र कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांना शुक्रवारीच मिळाली. त्या पार्टीत दुष्यंतसिंह यांच्या मातोश्री वसुंधराराजे शिंदे व कुटुंबातील अन्य सदस्यही होते.
नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य दीपेंदर हुडा यांच्याशी दुष्यंतसिंहांनी हस्तांदोलन करून अभिनंदन केले. त्यांची गळाभेटही झाली होती. चौथ्यांदा लोकसभेचे सदस्२य बनलेल्या दुष्यंतसिंहांचे सर्व पक्षांत मोठा मित्र आहेत. निशिकांत दुबे, सुप्रिया सुळे, नीरज शेखर, सौगत रॉय, महुआ मोईत्रा, मीनाक्षी लेखी आदी १५ जणांसह ते नेहमी गप्पांचा फड रंगवितात.व जेवतात. त्यांच्या गोतावळ््यामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायनही आहेत.
संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय न घेणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ओब्रायन यांनी टीका केली आहे.
विविध पाट्यांमध्ये सहभागी
वित्त विधेयक सोमवारी वा मंगळवारी संमत झाल्यावर अधिवेशन स्थगित केले जाईल अशी चर्चा आहे. लखनौचे नवाब आदिल यांनी १३ मार्च रोजी दिलेल्या पार्टीत दुष्यंतसिंह व अनेक मान्यवर हजर होते. त्यानंतर दुष्यंतसिंह दिल्लीला परतले. तिथे विविध पार्ट्यांमध्ये ते सहभागी झाले. तो प्रकार आज, शुक्रवार सकाळपर्यंत सुरू होता.
कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी समजल्यानंतर दुष्यंतसिंह यांनी एकांतवासात राहण्याचा निर्णय घेतला.