CoronaVirus : "साहेब, कोरोनाची नाही तर खराब रस्त्यांची भीती वाटते"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:35 PM2020-04-15T17:35:13+5:302020-04-15T17:44:43+5:30
CoronaVirus : नयनाबेन वाघ या सोमनाथ कोस्टल पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून वायरलेस ऑपरेटर आहेत.
जुनागड : देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध योजना करण्यात येत आहेत. तसेच, देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे.
या कोरोनाच्या लढ्यात अनेक डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी खऱ्या अर्थाने कर्तव्य बजावत आहेत. अशाच प्रकारे गुजरातमधील नयनाबेन वाघ या पोलीस स्टेशनमध्ये वायरलेस ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. त्या सात महिन्यांच्या गर्भवती आहेत. तरीही, त्या रोज ड्युटीवर येतात. त्यांना कोरोनाची भीती वाटत नाही, तर खराब रस्त्यांची जास्त भीती वाटते.
नयनाबेन वाघ या सोमनाथ कोस्टल पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून वायरलेस ऑपरेटर आहेत. त्या सुत्रापाडाहून रोज ड्युटीवर येतात. त्यांचे पती त्यांना रोज सकाळी स्कूटरवरून पोलीस स्टेशनपर्यंत सोडतात आणि संध्याकाळी पुन्हा घरी घेऊन जातात.
"मला कोरोनाची भीती वाटत नाही, तर शहरातील खराब रस्त्यांची खूप भीती वाटते. येता-जात काही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रोज ईश्वराकडे प्रार्थना करते. पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी माझ्यासाठी खास पंख्याची व्यवस्था केली आहे. माझ्यासाठी कुटुंबासह ड्युटी गरजेची आहे", असे नयनाबेन वाघ यांनी सांगितले. तसेच, सद्यस्थितीत लोकांना घरात राहा आणि सुरक्षित राहा असे आवाहनही नयनाबेन वाघ यांनी केले आहे.