Corona Virus In India: धोका टळलेला नाही! या चार राज्यांची कोरोना पाठ सोडेना; आरोग्य मंत्रालयाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 08:25 PM2022-02-10T20:25:19+5:302022-02-10T20:25:48+5:30
Corona Virus In India: गेल्या आठवड्याभरात जगभरात कोरोना विषाणूचे दैनंदिन पातळीवर सरासरी २६,४९,००५ रुग्ण आढळून येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिली.
Corona Virus In India: गेल्या आठवड्याभरात जगभरात कोरोना विषाणूचे दैनंदिन पातळीवर सरासरी २६,४९,००५ रुग्ण आढळून येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिली. यासोबतच देशभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. २६ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत जगभरात ३१,४४,६२२ रुग्ण दैनंदिन पातळीवर आढळून येत होते. पण आता त्यात घट झाली आहे. जगभरातील १४० देशांमध्ये आता रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण १० देशांमध्ये आढळत असल्याची माहिती संयुक्त आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं.
अमेरिका, फ्रान्स, इटली आणि स्पेनमध्ये सातत्यानं रुग्णसंख्या कमी होताना दिसत असल्याचंही लव अग्रवाल म्हणाले. देशात सध्या ७ लाख ९० हजार ७८९ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. गेल्या आठवड्यात दैनंदिनरित्या सरासरी ९६,३९२ रुग्ण आढळून येत होते. २१ जानेवारी रोजी तर देशात एकाच दिवशी ३ लाख ४७ हजार २५४ रुग्ण आढळून आले होते. आता रुग्णसंख्या ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. आज देशात ६७ हजार ०८४ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
केरळमध्ये अडीच लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण
देशातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ४.४४ टक्क्यांवर आला आहे. ५० हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या राज्यांची संख्या आता ८ वरुन ४ राज्यांवर आली आहे. तर २१ राज्यांमध्ये १० हजाराहून कमी रुग्ण आहेत. एकट्या केरळमध्ये सध्या अडीच लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. ४ राज्यांमध्ये ६१ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तर ३४ राज्यांमध्ये सातत्यानं पॉझिटिव्हीटी रेट घसरत असल्याचं दिसून आलं आहे. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये रुग्णसंख्या कमी होत असल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं. गेल्या चार दिवसांपासून देशात १ लाखापेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत आणि पॉझिटिव्हीटी रेट सुद्धा ५ टक्क्यांच्या खाली गेला आहे. पण केरळमध्ये २९ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर केरळसह मिझोराम, हिमाचल प्रदेश, अरुणाचल आणि सिक्किममधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. त्यामुळे निष्काळजीपणा बाळगून चालणार नाही, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.