Coronavirus : राजस्थानच्या भीलवाडात कोरोनाचे सहा रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 05:55 AM2020-03-21T05:55:17+5:302020-03-21T05:55:33+5:30
कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्यानंतर भीलवाडात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
भीलवाडा : राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या २७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात तीन डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यानंतर बाजारपेठा, जिल्ह्याची सीमा बंद करण्यात आली.
कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आल्यानंतर भीलवाडात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात खळबळ उडाली असून बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. आरसी व्यास कॉलनीस्थित बृजेश बांगड मेमोरियल हॉस्पिटल बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या खासगी रुग्णालयात भरती असलेल्या जवळपास ३५ रुग्णांपैकी काही रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. तर, ५ ते १० गंभीर रुग्णांना वेगवेगळ्या वॉर्डात ठेवले आहे. त्यांना आता अन्य हॉस्पिटलमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. दुपारनंतर बांगड हॉस्पिटलच्या परिसरात एक किमी क्षेत्रात संचारबंदी लागू केली आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे.
हॉस्पिटलचा बेजबाबदारपणा
बांगड हॉस्पिटलमध्ये गत आठवड्यात बापूनगरचा एक संशयित रुग्ण भरती झाला होता. न्यूमोनियाचा रुग्ण समजून त्याच्यावर उपचार केले गेले. हा रुग्ण नंतर जयपूरमध्ये एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर भीलवाडात आला होता. त्यानंतरच त्याचा घरीच मृत्यू झाला. त्यानंतर एक एक जण महात्मा गांधी हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले.
चीनमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही
बिजिंग : चीनमध्येच राहाणाऱ्या लोकांमध्ये सलग दुसºया दिवशी शुक्रवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. ही माहिती
तेथील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे.
चीनमध्ये तीन महिन्यांपासून कोरोनाच्या साथीने धुमाकूळ घातला आहे. हुबेई प्रांत व वुहान शहरात या साथीचा उगम झाला असून नंतर ती झपाट्याने जगभरातील अनेक देशांमध्ये पसरली. कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने वुहान व हुबेई प्रांतातील सर्व व्यवहार, वाहतूक बंद केली
होती. त्यामुळे तिथे आता या विषाणूचा फैलाव आटोक्यात आला आहे.