coronavirus: ...त्यामुळे काही ठिकाणी कोरोनाविरोधातील लढाई बनली आव्हानात्मक- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:43 PM2020-06-17T19:43:23+5:302020-06-17T19:48:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले सलग दोन दिवस विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काही मोठी शहरे आणि मोठ्या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक झाला असल्याचे सांगितले.
नवी दिल्ली - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे देशासमोरील कोरोनाची लढाई अधिकाधिक आव्हानात्मक होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले सलग दोन दिवस विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काही मोठी शहरे आणि मोठ्या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक झाला असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांशी संवादा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनलॉक-१ नंतरची ही आपली पहिलीच भेट आहे. सध्याच्या घडीला देशातील काही मोठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही शहरांमध्ये गर्दी, लहान घरे , गल्लीबोळांमध्ये फिरताना फिजिकल डिस्टंसिंग बाळगण्यात येणाऱ्या अडचणी तसेच दररोज हजारो लोकांची होणारी ये जा यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला आव्हानात्मक बनवले आहे.
Prime Minister Narendra Modi today held the second part of two-day interaction with CMs via video conferencing to discuss the situation post Unlock 1.0 and plan for tackling the COVID-19 pandemic: Prime Minister's Office (PMO) pic.twitter.com/BFyp4ALeP6
— ANI (@ANI) June 17, 2020
मात्र असे असले तरी देशवासियांचा संयम आणि विविध ठिकाणी प्रशासनाने दाखवलेली तत्परता व आमच्या कोविड योद्ध्यांनी दाखवलेला समर्पणभाव यामुळे आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकलो आहोत. कोरोनाबाधितांचा वेळीच घेण्यात येत असलेला शोध, उपचार यामुळे आपल्याकडील बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरजही खूप कमी रुग्णांना भासत आहे.
तसेच सद्यस्थितीत वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करणे आणि प्रत्येकाचे जीवन वाचवण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. जेव्हा कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळतील तेव्हाच ही बाब शक्य होईल, त्यासाठी आपल्याला टेस्टिंग वाढवावे लागेल, तसे झाल्यास आपण बाधितांना वेळीच ट्रेस करून ट्रॅक आणि आयसोलेट करू शकू, असेही मोदीनी सांगितले.