Coronavirus : म्हणून दिल्लीत चक्क माकडांना केलं जातंय क्वारेंटाइन, कारण वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 06:12 PM2021-05-20T18:12:23+5:302021-05-20T18:12:48+5:30
Coronavirus News: दिल्लीमध्ये वनविभागाकडून चक्क माकडांना पकडून क्वारेंटाइन केले जात आहे. मात्र त्यामागचं कारण वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारेंटाइन केले जात आहे. मात्र दिल्लीमध्ये वनविभागाकडून चक्क माकडांना पकडून क्वारेंटाइन केले जात आहे. मात्र त्यामागचं कारण वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
दिल्लीतील वनविभागाने हल्लीच छतरपूरमध्ये स्थित असलेल्या राधास्वामी सत्संग ब्यास परिसरात सुरू असलेल्या सरदार पटेल कोविड केअर सेंटरमधून पकडलेल्या ५८ माकडांना १४ दिवसांसाठी क्वारेंटाइन केले आहे. ही माकडे कोरोनाबाधित रुग्णांचे भोजन आणि कपडे इत्यादी उचलून नेत असल्याचा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. या माध्यमातून माकडांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने या माकडांना पकडून क्वारेंटाइन केले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पकडल्या गेलेल्या कुठल्याही माकडांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. वनविभागाने आतापर्यंत २० माकडांची अँटिजन चाचणी केली आहे. ज्यामध्ये सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. वनविभागाच्या म्हणण्यानुसार दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या पथकाने सरदार पटेल कोविड-१९ सेंटर आणि दक्षिण दिल्लीमधील अन्य हॉटस्पॉट भागातून एकूण ५८ माकडांना पकडून वनविभागाकडे सोपवले होते.
कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेल्या भागातून या माकडांना पकडण्यात आल्याने ही माकडे कोरोनाबाधित असण्याची भीती होती. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने या माकडांना तुगलकाबाद येथील पशू संरक्षण केंद्रात ठेवले होते.