Coronavirus :...तर पुन्हा करू नका आरटी-पीसीआर टेस्ट, कोरोना तपासणीबाबत आयसीएमआरने दिल्या नव्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 11:08 PM2021-05-04T23:08:33+5:302021-05-04T23:09:10+5:30
Coronavirus News : देशामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णसंख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या चाचण्यांबाबत आयसीएमआरने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत.
नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलेला आहे. संसर्गाचा वेग प्रचंड वाढत असल्याने रुग्णसंख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्या वाढवण्यात येत आहे. मात्र त्याचा ताण चाचणी केंद्रांवर येत आहे. पण आता कोरोनाच्या चाचण्यांबाबत आयसीएमआरने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत.
आयसीएमआरने आरटी-पीसीआर चाचण्या कमी करून रॅपिट अँटीजन चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. अनेक चाचणी केंद्रावर आलेला दबाव कमी करण्यासाठी आयसीएमआरने हा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीएमआरने केलेल्या काही महत्त्वपूर्ण सूचना पुढील प्रमाणे आहेत.
- ज्या लोकांची आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असेल, अशांची पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येऊ नये.
- रुग्णालयामध्ये कोरोनाच्या संसर्गामधून बरे झाल्यानंतर डिस्चार्जच्यावेळी पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही
-प्रयोगशाळांवरील दबाव कमी करण्यासाठी आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्याची अनिवार्यता संपूर्णपणे हटवण्यात यावी
- ताप किंवा कोविडची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींनी अनावश्यक प्रवास आणि आंतरराज्यीय प्रवास टाळावा. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल.
- कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तींनी प्रवासादरम्यान, कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
- राज्यांनी आरटीपीसीआर चाचण्यांना मोबाइल सिस्टिमच्या माध्यमातून वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे
आयसीएमआरने आपल्या नव्या सूचनांमध्ये सांगितले की, रॅपिड अँटिजन टेस्टच्या माध्यमातून कोरोना चाचण्या करण्याची सुरुवात जून २०२० पासून झाली होती. सध्या कंटेन्मेंट झोन आणि आरोग्य केंद्रांवर या चाचणीचा वापर होत आहे. या चाचणीच्या माध्यमातून १५ ते २० मिनिटांत निदान होते, त्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.
रॅपिड टेस्टबाबतचे सल्ले
रॅपिड अँटीजन टेस्ट सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयात अनिवार्य करावी
शहर आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर रॅपिड अँटिजन चाचणीचे बुथ उभे करावेत.
शहर आणि गावांमध्ये आरएटी बूथ शाळा-कॉलेज, कम्युनिटी सेंटर येथे हे बुथ उभारावेत. हे बुथ नियमितपणे सुरू राहावेत.
स्थानिक प्रशासन आपल्या पातळीवर ड्राइव्ह थ्रू बुथसुद्धा सुरू करू शकते.