coronavirus: म्हणून कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढूनही भारतात मृत्युदर आहे कमी, आरोग्य मंत्रालयाने सांगितले कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 08:17 AM2020-05-20T08:17:04+5:302020-05-20T08:20:45+5:30
भारतात आतापर्यंत दर एक लाख लोकसंख्येमागे ०.२ टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात हाच दर प्रतिलाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४.१ एवढी आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढला आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. मात्र असे असले तरी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याचे नेमके कारण सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, भारतात आतापर्यंत दर एक लाख लोकसंख्येमागे ०.२ टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात हाच दर प्रतिलाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४.१ एवढी आहे.
याबाबत अधिक स्पष्ट करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे त्याचे कारण म्हणजे भारतात कोरोनाग्रस्तांची वेळीच चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जानेवारी महिन्यात देशात केवळ एका लॅबमध्ये कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी होत होती. मात्र आज ३८५ सरकारी आणि १८ खासगी लॅबमध्ये कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी होत आहे.
भारतात आतापर्यंत ३ हजार १६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २४ लाख २५ हजार ७४२ नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात १ लाख ०१ हजार १३९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोमवारी देशात कोरोनाच्या १ लाख ०८ हजार संशयित नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा हवाला देऊन आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, जगभरात मंगळवारपर्यंत ३ लाख ११ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात दर एक लाख लोकांमागे ४.१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.