Coronavirus: रुग्णवाहिका न मिळाल्यानं कारच्या टपावर वडिलांचा मृतदेह बांधून मुलगा स्मशानभूमीत पोहचला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 03:41 PM2021-04-25T15:41:03+5:302021-04-25T15:42:11+5:30
जयपूर हाऊस येथे राहणाऱ्या मोहित यांना अनेक प्रयत्न करूनही वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही.
आग्रा – कोरोना महामारीचा कहर देशात पाहायला मिळत आहे. एकीकडे संक्रमण वाढत चाललं आहे तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. दिवसाला ४० पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मृतदेह स्मशानभूमीकडे घेऊन जाण्यासाठी अँम्ब्युलन्स मिळत नाहीत. एका एका अँम्ब्युलन्समध्ये ३-४ मृतदेह घेऊन जावं लागत आहे. शनिवारी अँम्ब्युलन्स न मिळाल्याने एका युवकाने त्याच्या वडिलांचा मृतदेह कारच्या छतावर बांधून स्मशानभूमीकडे नेतानाचा दृश्य पाहायला मिळालं.
जयपूर हाऊस येथे राहणाऱ्या मोहित यांना अनेक प्रयत्न करूनही वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर अखेर मोहितने वडिलांचा मृतदेह कारच्या टपावर बांधून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत नेला. अंत्यसंस्कारासाठी वेळ आल्यानंतर कारच्या टपावरील मृतदेह काढताना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. ताजगंज स्मशानभूमीच्या विद्युत शवदहनात सलग २० तास मृतदेह जळत होते. शनिवारी याठिकाणी तब्बल ५० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले होते.
मृतदेहांची संख्या जशी वाढत होती तसं अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्यांचा रांगा वाढत होत्या. शनिवारी संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कारासाठी ६ तासांची वाट पाहावी लागत होती. स्मशानभूमीत सगळीकडे चिता जळत होत्या. विद्युत शवदहनही मोठ्या प्रमाणात सुरू होते. स्मशान भूमीचे प्रभारी संजीव कुमार गुप्ता म्हणाले की, याठिकाणी मृतदेहांचे प्रमाण वाढले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मृतदेहांना अग्नी दिला जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना कमीत कमी वेळ वाट पाहावी लागेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी २०-२० तास काम करत आहेत.
कैलास स्मशानभूमी येथे एका दिवसात १-२ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते त्याठिकाणी आता दिवसाला ७-८ मृतदेह येत आहेत. स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचारी जसवंतने सांगितले की, मागील दहा-पंधरा दिवसापासून मृतदेहांची संख्या वाढली आहे. इतक्या संख्येने मृतदेह कधी येत नव्हते. परंतु तीनपटीने मृतदेह स्मशानभूमीत येत आहेत.