CoronaVirus: विजयवाडा येथील ५० टक्के रुग्णांचा संसर्गस्रोत गुलदस्तात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 02:33 AM2020-04-22T02:33:12+5:302020-04-22T02:33:32+5:30
शहर बनले रेड झोन; वाढती संख्या आंध्र प्रदेशसाठी धोक्याची घंटा
हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील विजयवाडा शहरातल्या ‘कोविड-१९’ च्या रुग्णांपैकी ५० टक्के लोकांना कोणाच्या संपर्कात आल्यामुळे बाधा झाली याचा थांगपत्ताच लागत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे; तसेच बऱ्याच रुग्णांमध्ये लागण झाल्याची कोणतीही प्राथमिक लक्षणे आढळली नाहीत.
कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए. मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले की, विजयवाडा शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असून, ते राज्यातील नवा हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहे. इतर जिल्ह्यांतील ठिकाणांपेक्षा विजयवाडा शहरात या साथीने मरण पावलेल्यांची संख्या अधिक आहे. कृष्णा जिल्ह्यात सामुदायिक संसर्गाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारपर्यंत तेथे ८० रूग्ण असून त्यापैकी ७२ विजयवाडा शहरातील आहेत. त्यातील ३० जणांना कोणाकडून हा संसर्ग झाला याचा थांगपत्ता लागत नाही. या बाधित ३० जणांनी विदेशवारी केली नाही किंवा इतर बाधितांच्या ते कधी संपर्कातही आले नाही. या कोरोनाग्रस्तांची चाचणी केली असता त्यांच्यातील ९० टक्के लोकांमध्ये या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती.
कृष्णा जिल्ह्यासाठी १४ हजार टेस्टिंग किट
आंध्र प्रदेशमधील एकूण रुग्णसंख्या ७२० वर गेली आहे. विजयवाडा शहरच आता रेड झोन बनले आहे. शहरातील २० किलोमीटरच्या परिघात मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचे निवासस्थान, विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांचे घर, तसेच राज्य सचिवालय, विधिमंडळ अशा महत्त्वाच्या वास्तू आहेत. विजयवाडात सर्वाधिक प्रादुर्भाव झालेले १८ विभाग असून, शहरामध्ये ३ मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. कृष्णा जिल्ह्यात आतापर्यंत ४५०० जणांची कोरोना चाचणी झाली आहे. केंद्र सरकारने या जिल्ह्यात १४००० रॅपिड टेस्टिंग किट पाठविले आहेत.