Coronavirus: भारतात सौम्य संसर्गासह फैलावणार ओमायक्रॉन, या व्हेरिएंटला पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 01:22 PM2021-12-26T13:22:31+5:302021-12-26T13:22:49+5:30
Omicron Variant In India: दक्षिण आफ्रिकेप्रमाणे भारतातही बहुतांश लोकांमध्ये याचा सौम्य संसर्ग दिसून येईल, असा दावा ओमायक्रॉन व्हेरिएंटला पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या डॉक्टर एंजेलिके कोएट्झी यांनी हा दावा केला आहे.
नवी दिल्ली - भारतामध्येओमायक्रॉनच्या संसर्गाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. तसेच देशात हाय पॉझिटिव्हिटी रेट दिसू शकतो. मात्र दक्षिण आफ्रिकेप्रमाणे भारतातही बहुतांश लोकांमध्ये याचा सौम्य संसर्ग दिसून येईल, असा दावा ओमायक्रॉन व्हेरिएंटला पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या डॉक्टर एंजेलिके कोएट्झी यांनी हा दावा केला आहे. दक्षिण आफ्रिका मेडिकल असोसिएशनच्या चेअरपर्सन असलेल्या कोएट्झी यांनी सांगितले की, सध्याच्या लसी ह्या संसर्गाला निश्चितपणे नियंत्रित करतील. मात्र लस न घेणाऱ्यांना १०० टक्के धोका आहे.
पीटीआयसोबत फोनवरून बोलताना डॉ. कोएट्सझी यांनी सांगितले की, लसीकरण झालेल्या किंवा आधीच संसर्ग झालेल्या लोकांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग कमी प्रमाणात होईल. मात्र कोरोनाची लस न घेणाऱ्या व्यक्ती हा विषाणू फैलावण्याचे काम करतील, असे त्या म्हणाल्या. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. तसेच ही साथ पुढच्या काही दिवसांमध्ये ती एंडेमिक स्टेजवर जाऊ शकते. एंडेमिक ही अशी स्थिती असते जेव्हा कुठल्याही ठिकाणी विषाणू किंवा साथ ही सातत्याने कायम राहते. डॉ. कोएट्झी यांनी ओमायक्रॉन हा अंताच्या दिशेने जात आहे, तसेच इतर व्हेरिएंटपेक्षा कमी धोकादायक आहे, या तज्ज्ञांच्या दाव्याशी असहमती व्यक्त केली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत भारतामध्ये ओमायक्रॉनचे ४१५ रुग्ण सापडले आहेत. त्यामधील ११५ जणांनी आजारावर मात केली आहे. डॉ. कोएट्झी यांनी सांगितले की, कुठलाही विषाणू हा नियंत्रणाबाहेर जातो तेव्हा तो मानवजातीसाठी धोकादायक ठरतो.
संपूर्ण जगामध्ये पसरत असलेल्या ओमायक्रॉनबाबत डॉ. कोएट्झी यांनी सांगितले की, नवा विषाणू हा तरुण आणि मुलांवर हल्ला करत आहे. सद्यस्थितीमध्ये ओमायक्रॉन हा अधिक धोकादायक नाही आहे. मात्र हा हाय इफेक्टिव्हिटी रेटसह पसरत आहे. रुग्णालयामध्ये याचा संसर्ग झालेले कमी गंभीर रुग्ण आहेत. हा व्हेरिएंट बाधित करून स्वत:ला जिवंत ठेवतो. मात्र दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण सरासरी ५ ते ६ दिवसांमध्ये रिकव्हर होत आहेत.