Coronavirus: रेल्वेच्या ढिसाळ व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे हाल; सुविधांअभावी समस्येत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 09:43 AM2020-05-17T09:43:36+5:302020-05-17T09:44:14+5:30
शनिवारी गाडीत बसल्यावर कोणतीही पूर्वकल्पना न देता गाडी सुरू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना फळे, नाश्त्याची पाकीटे देऊ शकलो नाही.
उमेश जाधव
नवी दिल्ली : दिल्लीतून महाराष्ट्रात परतणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना शनिवारी रेल्वेच्या चुकीच्या व्यवस्थापनाचा फटका बसला. जेवण नाही, स्वच्छताग्रुहात पाण्याचा अभाव, फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन न करता विद्यार्थ्यांना जनरलच्या डब्यात बसवल्याने विद्यार्थ्यांचे आतोनात हाल झाले.
शनिवारी दिवसभर विद्यार्थ्यांची स्क्रिनिंग सुरू होती. काही विद्यार्थ्यांची रात्री उशिरापर्यंत स्क्रिनिंग उरकली नव्हती. काहीही न खाता विद्यार्थी रांगेत उभे होते. जुनी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर १०.२० वाजता गाडी आली. त्यानंतर केवळ पाच डब्यांमध्ये एक हजार विद्यार्थ्यांना बसवण्यात आले. जनरलच्या डब्यात व्यवस्था असल्याने मित्रांची मदत करण्यासाठी जाणेही शक्य नव्हते.
दिवसभर थकल्यामुळे विद्यार्थी रात्री जागा मिळेल तेथे झापले. पुरेशी जागा नसल्याने अनेकजण खालीच झोपले होते. रेल्वेने एका दिवसाची जेवनाची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. मात्र, जेवन न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शनिवारी उपाशीपोटीच रहावे लागले. त्याचवेळी स्वच्छता ग्रुहांमध्ये पाणीही नसल्याने विद्यार्थ्यांना रविवारीही स्वच्छता ग्रुहात जाणे शक्य झाले नाही.
विद्यार्थी समन्वय राजेश बोनावटे यांनी सांगितले की, शनिवारी गाडीत बसल्यावर कोणतीही पूर्वकल्पना न देता गाडी सुरू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना फळे, नाश्त्याची पाकीटे देऊ शकलो नाही. माझ्याकडे विद्यार्थ्यांचा नाश्ता आहे. मात्र, गाडी थांबत नसल्यामुळे मी मित्रांची मदत करू शकत नाही. रात्रीपासून ते उपाशीपोटी प्रवास करत आहेत. प्रचंड गोंधळाची परिस्थिती आहे. विद्यार्थीनींचे आतोनात हाल होत आहेत. रेल्वे थांबली तर किमान नाश्ता पोहोचवणे शक्य झाले असते. स्लीपरचे डबे रिकामे असतानाही आम्हाला या डब्यात का बसवण्यात आले हे समजत नाही. आम्ही घरी पोहोचू पण हा अनुभव आमच्यासाठी भयंकर असेल, असेही त्यांनी सांगितले.
किती वेळ उपाशी राहणार!
एका विद्यार्थीनीने सांगितले की, शनिवारी सकाळी गडबडीत घर सोडले त्यामुळे केवळ चहा घेऊन बाहेर पडलो. त्यानंतर दिवसभर जेवन मिळाले नाही. रात्रीही उपाशीपोटीच झोपलो. सकाळ झाली तरीही उपाशीच आहोत. किती वेळ उपाशी राहणार? असा प्रश्न तिने केला. सर्व विद्यार्थ्यांच्या बैगा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. तर का ही जणांच्या बैगा हरवल्या आहेत, असेही तिने सांगितले.
अस्वच्छ गाडी
विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांना रुमालाने सीट स्वच्छ केल्याचे विद्यार्थ्याने सांगितले.