CoronaVirus News: मोठा दिलासा! भारतातील कोरोनाबद्दल महत्त्वाची माहिती समोर; आता लढा होणार सोपा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 09:58 AM2020-08-02T09:58:29+5:302020-08-02T09:58:29+5:30
CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढतेय; सध्या दिवसाला ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येताहेत
नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतात पसरलेला कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, बहुतांश केसेस युरोपशी संबंधित आहेत. याआधी देशात पसरलेला कोरोना विविध प्रकारचा होता. मात्र आता एकाच प्रकारच्या कोरोनाचा फैलाव होत असल्याची माहिती पुढे आली आहे. एकाच प्रकारचा कोरोना असल्यानं आता त्याचा मुकाबला करणं सोपं असेल. सरकारनं केलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास बऱ्यापैकी मदत झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे.
जैवतंत्रज्ञान विभागानं कोरोनाबद्दलचा अहवाल तयार केला आहे. शनिवारी हा अहवाल आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना सोपवण्यात आला. देशात कोरोनाचा A2a होलोटाईप विषाणूचा वेगानं फैलावत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या विषाणूनं दुसऱ्या प्रकारच्या विषाणूला हटवलं आहे. सुरुवातीला भारतात कोरोना विषाणूच्या विविध प्रजाती पाहायला मिळत होत्या. यामध्ये युरोप, अमेरिका आणि पूर्व आशियातून आलेल्या कोरोनाच्या प्रजातींचा समावेश होता.
जगभरात कोरोना विषाणूच्या विविध प्रजातींचा फैलाव झाला आहे. यामध्ये A2a होलोटाईप, D614G, 19A आणि 19B चा समावेश आहे. भारतात आधी सर्व प्रजातींमधील कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. A2a होलोटाईप विषाणू युरोप आणि सौदी अरेबियातून भारतात आला. याआधी जानेवारीत आलेला विषाणू वुहानमधून आला होता. हा विषाणू 19A आणि 19B प्रजातीमधील होता. मात्र त्यांचं प्रमाण A2a च्या तुलनेत कमी होतं. त्यानंतर देशात केवळ A2a होलोटाईप शिल्लक राहिला. दिल्लीत D614G प्रकारच्या विषाणूचा फैलाव झाला होता. त्याचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. त्यामुळेच राजधानीतील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं कमी होताना दिसत आहे.