CoronaVirus: प्लाज्मा उपचाराचा चौघांवर यशस्वी प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:10 AM2020-04-25T04:10:27+5:302020-04-25T04:10:49+5:30
गंभीर रुग्णांसाठी रक्तदान करा : केजरीवाल
नवी दिल्ली : प्लाज्मा उपचार पद्धतीचा चार गंभीर रुग्णांवरील प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा करीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बरे झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्याचे कळकळीचे आवाहन शुक्रवारी केले. बरे होऊन घरी परतलेले कोरोनाचे रुग्ण पुढे आल्यास गंभीर रुग्णांचे प्राण वाचू शकणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डिजिटल पत्रकार परिषदेत आयएलबीएसचे प्रमुख डॉ. एस.के. सरीनदेखील उपस्थित होते. त्यांच्या निरीक्षणात प्लाज्मा उपचार पद्धतीचा प्रयोग केला जात आहे. केंद्र सरकारने केवळ लोकनायक रुग्णालयातील गंभीर रुग्णांवर प्लाज्मा उपचारपद्धतीचा प्रयोग करण्याची परवानगी दिली आहे.
येत्या दोन-तीन दिवसांत आणखी काही रुग्णांवर हा प्रयोग करून आम्ही केंद्र सरकारला संपूर्ण दिल्लीसाठी याची परवानगी मागू. त्यानंतर दिल्लीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात सरकारला यश मिळू शकेल, असे केजरीवाल म्हणाले.
अवयव निकामी होण्यापूर्वी विषाणू शरीरात जाणे, फुफ्फुसांना इजा पोहोचविणे आणि त्यानंतर अवयव निकामी होणे, या तीन फेजमधून कोरोनाच्या रुग्णाला जावे लागते. फुफ्फुसाला इजा झाल्यास श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे आदी त्रास जाणवू लागतात. त्याचवेळी प्लाज्मा उपचार पद्धतीचा प्रयोग केल्यास अवयव निकामी होण्यापासून वाचू शकतात, अशी माहिती डॉ. एस.के. सरीन यांनी दिली.
काय आहे पद्धती?
बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्मा गंभीर रुग्णांच्या रक्तात सोडला, तर प्राण वाचू शकतात.
लोकनायकमधील चारपैकी दोन रुग्णांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे आणि आज त्यांना जनरल वॉर्डामध्ये हलविण्यात येईल.
इतर दोन रुग्णांचीही प्रकृती आता हळूहळू स्थिर होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लोकनायकमधील आणखी तीन रुग्णांवर हा प्रयोग होणार आहे, असेही ते म्हणाले.