coronavirus : कोरोनाच्या मोफत चाचणीचा आदेश सुप्रीम कोर्टाने बदलला,आता केवळ यांनाच मिळणार लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 09:04 PM2020-04-13T21:04:55+5:302020-04-13T21:08:53+5:30
सर्वोच्च न्यायालयाने देशातील खासगी लॅबमध्येही कोरोनाची चाचणी मोफत करण्यात यावी, असे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे वेगाने होत असलेले संक्रमण आणि त्याला रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने देशातील खासगी लॅबमध्येही कोरोनाची चाचणी मोफत करण्यात यावी, असे आदेश दिले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय बदलला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या बदललेल्या निर्णयामुळे आता खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी सरसकट मोफत होणार नाही. तर सुधारित निर्णयानुसार भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेनुसार पात्र असलेल्यांचीच मोफत कोरोना चाचणी होणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांची कोरोना चाचणी मोफत होणार आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्याकडून खासगी लॅबमधील चाचणीचे शुल्क घेण्यात येईल.
आरोग्य मंत्रालय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांव्यतिरिक्त अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती, आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थी यांच्या कोरोनाच्या मोफत चाचणीबाबत विचार करू शकते. त्याबाबत योग्य ते आदेश आठवडाभरात द्यावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
सध्या खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी साडेचार हजार रुपये आकारले जातात. दरम्यान, खासगी लॅबमध्येही कोरोनाची मोफत चाचणी व्हावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. मात्र हा आदेश आता बदलला आहे.