CoronaVirus : मौलाना साद यांचा कोरोना अहवाल 'निगेटिव्ह', उद्या क्राइम ब्रांचसमोर हजर राहण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 07:55 PM2020-04-26T19:55:48+5:302020-04-26T20:25:36+5:30
CoronaVirus : क्राइम ब्रांचकडून तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांचा सतत शोध सुरु आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तबलिगी जमातमधील बर्याच लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातच दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातचे प्रमुख असलेल्या मौलाना साद यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच, मौलाना साद हे क्राइम ब्रांच समोर हजर राहू शकतात.
मौलाना साद यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, मौलाना साद यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या आदेशानुसार, मौलाना साद यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचबरोबर, उद्या क्राइम ब्रांचसमोर मौलाना साद हजर होऊ शकतात.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडून तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांचा सतत शोध सुरु आहे. परंतु, अद्याप क्राइम ब्रांचला यश आले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी आज तक या वृत्तवाहिनीशी मौलाना साद यांनी बातचीत केली होती. यावेळी ते म्हणाले होते, "दिल्ली क्राइम ब्रांचला माहीत आहे की मी कुठे आहे. क्राइम ब्रांचने दोन नोटीसही पाठवल्या असून त्याबाबत आम्ही आधीच उत्तर दिले आहे."
याचबरोबर मौलाना साद म्हणाले होते, "दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने माझ्या मुलाच्या उपस्थितीत घराची झडती घेतली आहे. तसेच, मला कोरोना चाचणी करण्यास सांगितले. मी कोरोनाची चाचणी केली आहे. याशिवाय, या अहवालाची माहिती दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडे दिली जाईल. क्राइम ब्रांच जे सांगत आहे, त्याचे आम्ही पालन करीत आहोत."
दरम्यान, मौलाना साद यांच्याबाबत अनेक खुलासे समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. अंमलबजावणी संचालनालय, क्राइम ब्रांच, दिल्ली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, मौलाना साद अद्यार सुरक्षा यंत्रणेसमोर आले नाहीत. त्यांचे ऑडिओ मेसेज सतत सोशल मीडियावर येत आहेत. त्यामध्ये त्यांनी स्वत: क्वारंटाईन केल्याचा दावा केला आहे.