Coronavirus: पोलिसांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा; गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 10:48 PM2020-05-04T22:48:47+5:302020-05-04T22:49:10+5:30
‘कोविड-१९’मुळे कायद्याच्या रक्षकांमध्ये बळींचे प्रमाण वाढले
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात सर्वच राज्यांमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचे मत्यू ओढविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कायद्याच्या रक्षकांचे संसर्गामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.
याबाबत गृह मंत्रालयाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्यात प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन दैनंदिन कामे न करणाऱ्या पोलिसांना घरून काम करण्याची मुभा देता येईल का याचा विचार व्हावा, असे सुचविण्यात आले आहे; तसेच ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी ड्यूटीवर असतात त्या कार्यालयांचे; तसेच ठिकाणांचे नीटपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या लढाईत प्रशासकीय यंत्रणेतील पोलीस हा घटक अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत प्रभावी उपाययोजना करण्यावर भर दिला जावा, असे निर्देशही गृह मंत्रालयाने पाठविलेल्या पत्रांमध्ये देण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
महाराष्ट्रात आतापर्यंत २३० पोलिसांना संसर्ग
देशात महाराष्ट्राला या भयंकर रोगाचा सर्र्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि मृतदेखील महाराष्ट्रातीलच आहेत. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी साहजिकच पोलीस व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असतानाच अनेक चौकांत पोलीस तैनात असलेले दिसून येत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी त्यांच्याकडे असलेली साधने मर्यादित आहेत. आतापर्यंत राज्यात सुमारे २३० पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. याशिवाय ५ जणांचा बळीदेखील गेला आहे. यात मुंबईतील ४, तर पुण्यातील एका पोलिसाचा समावेश आहे. पुण्यात एका ५७ वर्षीय सहायक उपनिरीक्षकाला सोमवारी मृत्यूने गाठले.