CoronaVirus: टाटा ट्रस्टकडून पुन्हा मदतीचा हात; अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य एअरलिफ्ट करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 20:34 IST2020-04-17T20:16:25+5:302020-04-17T20:34:53+5:30
coronavirus कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी १५०० कोटींची मदत जाहीर केल्यानंतर पुन्हा टाटा सरसावले

CoronaVirus: टाटा ट्रस्टकडून पुन्हा मदतीचा हात; अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य एअरलिफ्ट करणार
मुंबई: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर आता पुन्हा एकदा टाटा देशाच्या मदतीला धावले आहेत. पीपीई किट्स, सर्जिकल मास्क, ग्लोव्ज यासारख्या अत्यावश्यक वस्तू एअरलिफ्ट करण्याचं काम आता टाटा ट्रस्टकडून करण्यात येईल. १५० कोटी रुपयांचं वैद्यकीय साहित्य टाटा ट्रस्टकडून देशभरात एअरलिफ्टच्या माध्यमातून देशभरात पोहोचवलं जाईल. टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या मदतीनं ही मदत पोहोचवली जाण्यात येणार असल्याची माहिती टाटा ट्रस्टनं दिली आहे.
टाटा ट्रस्टकडून कव्हरऑल्स, मास्क, ग्लोव्ज यांचा समावेश असलेली पीपीई किट्स, एन ९५/केएन ९५ मास्क आणि सर्जिकल मास्क देशभरात पोहोचवले जाणार आहेत. 'येत्या काही आठवड्यांमध्ये विविध टप्प्यांमध्ये सर्वाधिक आवश्यकता असलेल्या भागांमध्ये वैद्यकीय साहित्य पाठवलं जाईल. या साहित्याचं मूल्य १५० कोटी रुपये इतकं असेल,' अशी माहिती टाटा ट्रस्टनं प्रसिद्धीपत्रकातून दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव माणसासमोरील कठीण संकट असून त्याचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय वस्तू तातडीनं गरज असलेल्या ठिकाणी पोहोचवायला हव्यात, अशा सूचना रतन टाटांनी दिल्यानंतर टाटा ट्रस्टनं हे महत्त्वाचं पाऊल उचललं. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहानं याआधी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी १५०० कोटी रुपयांच्या मदत जाहीर केली असून यातले ५०० कोटी रुपये टाटा ट्रस्टनं दिले आहेत.