Coronavirus:'...तरीही लोक घराबाहेर दिसल्यास आता गोळ्या घालण्याशिवाय पर्याय नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 10:17 AM2020-03-25T10:17:56+5:302020-03-25T12:41:36+5:30
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 560 वर गेली असून, आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 46 जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे.
हैदराबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 21 दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री 8 वाजता केली. मात्र महाराष्ट्र, तेलंगणा यांच्यासह अन्य काही राज्यांनी याआधीच लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरी देखील नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन न करत घराबाहेर निघत असल्याचे दिसून आले. परंतु आता नागरिक असचं बेजबाबदारपणे वागल्यास सरकारकडे गोळी घालण्याशिवाय पर्याय राहणार नाही असं वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले आहे.
के. चंद्रशेखर राव म्हणाले की, अमेरिकेला लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी सैन्याची मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे राज्यातही लॉकडाऊन लागू केल्यानंतर नागरिक अत्यावश्यक काम नसतानाही घराबाहेर निघत असतील तर मला 24 तास राज्यात कर्फ्यू लागू करावा लागेल. तसेच नागरिक रस्त्यावर फिरत असल्यास त्यांना दिसताक्षणीच गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यास सरकारला भाग पाडू नका असं चंद्रशेखर राव यांनी यावेळी म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन असताना देखील नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने के. चंद्रशेखर राव यांना नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रशेखर राव पेट्रोल पंप बंद करण्याचा आणि रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी सैन्याची मदत घेण्यासंबंधित विचार करत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. रात्री 7 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यत कर्फ्यू लागू असणार असून सर्व दुकानं सायंकाळी 6 पर्यत बंद करण्याचे आदेश के. चंद्रशेखर राव यांनी दिले आहेत.
In US,Army had to be called in to enforce lockdown.If people don't follow #CoronavirusLockdown,a situation may arise where we'll have to impose 24-hour curfew & issue shoot-at-sight orders.I urge people not to let such a situation arise:Telangana CM K Chandrashekar Rao (24.03.20) pic.twitter.com/he7KpLYrOb
— ANI (@ANI) March 24, 2020
कोरोना विषाणूनं भारतात थैमान घातलं असून, बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. तेलंगणात मंगळवारी आणखी ३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 36 वर पोहचली आहे.
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 560 वर गेली असून, आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 46 जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले 105 रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्तांमध्ये 41 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 21 दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा नरेंद्र मोदींनी केली. स्वत:ला वाचवण्यासाठी, कुटुंबीयांना वाचवण्यासाठी आणि देशाला वाचवण्यासाठी पुढील 21 दिवस घरात राहा. बाहेर पडू नका, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. परिस्थिती अतिशय आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत संपूर्ण देश एक म्हणून उभा आहे. 21 दिवसांचा कालावधी मोठा आहे. मात्र आपण निश्चितपणे कोरोनावर विजय मिळवू, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.