CoronaVirus: तेलंगणामध्ये आता होम क्वारंटाईनचा कालावधी २८ दिवसांचा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:19 AM2020-04-25T04:19:46+5:302020-04-25T04:20:53+5:30
आतापर्यंत ५ राज्यांनी घेतला असा निर्णय
हैदराबाद : ‘कोविड-१९’या आजाराचा मोठ्या प्रमाणावर होणारा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांपैकी ज्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात येते, त्याचा कालावधी तेलंगणा सरकारने १४ दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत वाढविला आहे. असा निर्णय घेणारे तेलंगणा हे देशातील पाचवे राज्य आहे.
क्वारंटाईनच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय याआधी ओडिशा, केरळ, आसाम, झारखंड या चार राज्यांंनी घेतला आहे. संशयितांना २ आठवडे घरीच क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र, या कालावधीत काही रुग्णांमध्ये आजाराची कोणतीच लक्षणे दिसून येत नव्हती. हा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा चाचणीत मात्र, त्यांना संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले होते. या घटनांमुळे क्वारंटाईनचा कालावधी आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. मूळ रुग्णाकडून लागण झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींच्या चाचण्या घेण्याचा आदेश तेलंगणा सरकारने दिला आहे. मात्र मूळ रुग्णांकडून संसर्ग झालेल्यांकडून ज्यांना लागण झाल्याचा संशय आहे अशा व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करावे. त्यांच्या चाचणीची आवश्यकता नाही. अशा रुग्णांच्या प्रकृतीची रोज तपासणी केली जावी, असेही आदेशात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)