Coronavirus: कोरोनाविरोधातील भारताच्या लढ्याचं 'तिनं' केलं कौतुक; थेट अमेरिकेत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:51 PM2020-04-13T15:51:48+5:302020-04-13T16:02:22+5:30
कोरोनाविरोधातील लढ्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलं होतं. त्याविरोधात एका एनआरआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हैदराबाद: कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं असून, अमेरिकेतही हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता आणि विकसित असलेल्या देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यानं जगासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. अमेरिकेत न्यू जर्सी येथे राहणाऱ्या तेलंगणातील एका महिलेनं भारत कोरोनाला रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. त्यानंतर तिच्यावर अमेरिकाविरोधात विधान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील स्वाती देवीनेनी हिने ट्विट करून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलं होतं. त्याविरोधात एका एनआरआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे राहणा-या श्रावण नावाच्या एनआरआयने स्वाती देवीनेनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रावणच्या म्हणण्यानुसार, देवीनेनी हिने एक व्हिडीओ ट्विट केला होता, ज्यात अमेरिकीविरोधी वक्तव्यं करण्यात आली आहेत. या व्हिडीओमध्ये स्वाती देवीनेनी म्हणत आहे की, अमेरिकेसारखा शक्तिशाली देश कोरोना विषाणूसारखे साथीचे रोग रोखण्यात अपयशी ठरला आहे, तर भारताने त्यावर मात केली आहे.
व्हिडीओमध्ये देवीनेनी म्हणते, 'अमेरिका चांगली आरोग्य सुविधा असलेला संपन्न देश आहे. परंतु तरीही अमेरिका कोरोना विषाणूच्या महारोगराईला रोखू शकलेला नाही. या रोगाबद्दल भारताला पूर्वकल्पना होती, ज्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यापासून रोखण्यात आले. माझा भारत महान आहे. स्वातीचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेलुगू लोकांनीही यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यानंतर सोशल मीडियावर स्वाती देवीनेनीनेही या व्हिडीओबद्दल दिलगिरी व्यक्त केली.I got this clip from someone on whatsapp and felt like sharing it. She is Swathi, an NRI living in Newyork. This is her sharing on current situation. pic.twitter.com/rV9FDB8Ykc
— Jogulamba (@JogulambaV) April 10, 2020
स्वाती हिनं आपल्या स्पष्टीकरणासाठी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये म्हणते, भारताच्या तुलनेत अमेरिकेला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता. कोरोनाच्या साथीच्या रोगाचा भारत कसा सामना करीत आहे, याबद्दल मी माझ्या मातृभूमीचे फक्त कौतुक केले. या गोष्टी माझ्या स्वत: च्या नव्हत्या. मी हे इतरत्र वाचले आहे, जे आधीच सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध आहे. देवीनेनी म्हणाली, कोणीतरी हा व्हिडीओ डाऊनलोड केला आणि त्यांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर पोस्ट केला. स्वाती देवीनेनी ही तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. वर्षभरापूर्वी ती आपल्या पतीसह अमेरिकेत स्थायिक झाली होती. तिचे पती सॉफ्टवेअर अभियंते आहेत.