Coronavirus: टेन्शन! देशातील ९ राज्यात रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्राला दिलासादायक परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 05:24 AM2021-10-03T05:24:07+5:302021-10-03T05:25:50+5:30
मिझोरामनंतर केरळमध्ये देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे. येथे १४ टक्के वेगाने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत
विकास झाडे
नवी दिल्ली : दसरा, दिवाळी जवळ येत असताना देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये २४३५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मिझोराम, हरियाणा, गुजरात, झारखंड, गोवा, हिमाचल, मध्यप्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात रुग्ण वाढत आहेत.
केरळमध्ये सर्वाधिक प्रकरणे आणि मृत्यू
मिझोरामनंतर केरळमध्ये देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे. येथे १४ टक्के वेगाने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तथापि, दररोज बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या बाबतीत केरळ अव्वल आहे. येथे शुक्रवारी देशात सर्वाधिक १३ हजार ७६७ लोक संक्रमित झाले. केरळमध्येच कोरोनाचे बहुतेक रुग्ण मृत्यू पावत आहेत. शुक्रवारी येथे ९५ लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २५ हजार १८२ लोकांचा मृत्यू झाला आहे. ३.५ कोटी लोकसंख्या असलेल्या केरळमध्ये आतापर्यंत ४६.९४ लाख लोक संसर्गाने प्रभावित झाले आहेत. यापैकी १.४२ लाख रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ४५ लाख लोक बरे झाले आहेत.
९० कोटी डोसचा टप्पा पूर्ण
देशातील नागरिकांना कोरोना लसीचे ९० कोटी डोस देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा शनिवारी ओलांडण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही घोषणा केली. कोरोना लसीकरण मोहिमेची देशामध्ये १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. त्यानंतर ही मोहीम आता वेगाने राबविली जात आहे. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे की, तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा दिली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय विज्ञान’ असा नारा दिला होता. सध्याच्या काळात कोरोना लसीच्या संशोधनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय अनुसंधान’ असा नारा दिला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्यानंतर २ फेब्रुवारीपासून पोलीस, सुरक्षा दले, महापालिका कर्मचारी आदी कोरोना योद्ध्यांना लस देण्यास प्रारंभ झाला.
लसीकरणाचे टप्पे
१६ जानेवारीपासून पहिला टप्पा - आरोग्यसेवकांना लस देण्यास प्राधान्य.
१ मार्चपासून दुसरा टप्पा - ६० वर्षे वयावरील नागरिक, एकापेक्षा अधिक व्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात.
१ एप्रिलपासून तिसरा टप्पा - ४५ वर्षे वयावरील सर्वांना लस
१ मेपासून चौथा टप्पा - १८ वर्षे वयावरील सर्वांना लस.