coronavirus: '... तर विनाकारण शिक्षा भोगणाऱ्या आसाराम बापूंची सर्वात पहिल्यांदा सुटका करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 01:50 PM2020-03-30T13:50:00+5:302020-03-30T13:52:12+5:30
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या कैद्यांची तपासणी करुन त्यांना मोकळा श्वास घेण्यास राज्य सरकार परवानगी देत आहे
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गंभीर होत आहे. देशातील आणि राज्यीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार काही महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील जवळपास ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील इतर राज्यातही कैद्यांची सुटका करण्यासंबंधी विचारविनिमय अन् मागणी करण्यात येत आहे. त्यानंतर, भाजपाचे नेते आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुबमण्यम स्वामी यांनी आसाराम बापूंची सर्वात प्रथम सुटका करण्याची मागणी केली आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या कैद्यांची तपासणी करुन त्यांना मोकळा श्वास घेण्यास राज्य सरकार परवानगी देत आहे. जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात कैद असलेले आसाराम आणि राजस्थान सरकारचे माजी मंत्री महिपाल मदेरणा यांच्यासह इतर कैद्यांनी कारागृहातच उपोषण सुरू केले. कारागृहात कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी सुटकेची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील कैद्यांनी मंगळवारी उपोषण केले. सकाळच्या वेळी कारागृहात भोजन बनवण्यात आले होते. मात्र, या कैद्याने भोजन करण्यास नकार दिला. हे कैदी कारागृहातून सुटका करण्याची मागणी करत आहेत. यानंतर आता प्रशासनाने, ज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी तयार केली असून ही यादी राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे. यानंतर कुणाला पॅरोल द्यायचा आणि कुणाची शिक्षा कमी करायची यावर राज्य सरकार निर्णय घेईल, असे म्हटले आहे. या मागणीनंतर सुब्रमण्यस स्वामींनी आज ट्विवटरवरुन आसाराम बापूंची सर्वप्रथम सुटका करा, अशी मागणी केली आहे.
If convicted prisoners are being released by Government then the falsely found guilty and 85 year old ailing Asaram Bapu should be released first
— Subramanian Swamy (@Swamy39) March 30, 2020
जर सरकारकडून दोषी कैद्यांची सुटका करण्यात येत आहे, तर विनाकारण शिक्षा भोगणाऱ्या ८५ वर्षीय आसाराम बापू यांची सर्वप्रथम सुटका करावी, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय. स्वामी यांच्या या ट्विटरवर नेटीझन्सने त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून २०० पेक्षा जास्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या दोषी किंवा खटला दाखल असलेल्या आरोपी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळ-जवळ ११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पुढील आठवड्याभरात यावर कार्यवाही व्हावी, अशाही सूचना दिल्याचे देशमुख यांनी व्टिटद्वारे सांगितले आहे. त्यानुसार, कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर इराण सरकारने जेलमधील जवळपास 70, 000 हजार कैद्यांची सुटका केली. याबाबतची माहिती येथील मिझान ज्युडिशियरी साइटवर देण्यात आली आहे. तसेच, या बातमीला इराणचे ज्युडिशियरी चीफ इब्राहिम रायसी यांनी दुजोरा दिला. त्याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सरकारनेही ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.