CoronaVirus: तिसरी लाट भारतात घातक सिद्ध होऊ शकते; लंडनमधील डॉक्टर अमित यांनी व्यक्त केले मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:17 AM2021-06-15T05:17:18+5:302021-06-15T05:18:02+5:30
अमित यांचे म्हणणे असे की, डेल्टा व्हेरिएंट अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरतो. तसेच मुलांना प्रभावित करतो. परिणामी मुले या व्हेरिएंटचा फैलाव करणारे बनू शकतात.
- शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट भारतात दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ६० टक्के जास्त घातक सिद्ध होऊ शकते. तिसरी लाट मुलांवर सर्वांत जास्त प्रभाव टाकेल, पण प्राणघातक नसेल, असे लंडनमधील जॉन रेडक्लिफ रुग्णालयाचे डॉक्टर अमित यांचे मत आहे.
अमित यांचे म्हणणे असे की, डेल्टा व्हेरिएंट अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरतो. तसेच मुलांना प्रभावित करतो. परिणामी मुले या व्हेरिएंटचा फैलाव करणारे बनू शकतात. अशी संक्रमित मुले कुटुंबातील वयस्कर व इतर सदस्यांना संक्रमित करू शकतात. यातून वाचण्यासाठी स्वत:सह मुले घराबाहेर पडण्यावर कडक बंधने घालावी लागतील आणि कोविड आचारसंहितेचे कठोर पालन करावे लागेल. त्यांचा तर्क होता की, मुलांची प्रतिकारशक्ती बळकट असल्यामुळे ही लाट मुलांसाठी प्राणघातक असणार नाही. डॉक्टर अमित मानतात की, अनलॉक प्रक्रियेदरम्यान भारतात नियम कठोरपणे लागू करण्याची गरज आहे. मास्क वापरला नाही, आवश्यक तेवढे अंतर राखले नाही आणि फारच आवश्यक नसतानाही घरातून बाहेर पडणे धोकादायक सिद्ध होऊ शकते.
उत्तर प्रदेश डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि हृदयरोग विशेषज्ञ डॉक्टर के. सी. सूद यांनी म्हटले की, तिसरी लाट हृदयाच्या रोग्यांना जास्त धोकादायक होऊ शकते.
डेल्टा व्हेरिएंटमुळे ४० हजार संक्रमित
ब्रिटनचे उदाहरण देताना सूद म्हणाले की, डेल्टा व्हेरिएंटच्या कारणामुळे ४० हज़ार लोक आतापर्यंत संक्रमित झाले आहेत आणि आतापर्यंत त्याचा कहर सुरूच आहे. आमच्या येथे अनलॉकनंतर सर्व काही खुले झाले आहे आणि लोक अतिशय बेजबाबदारपणे वागत आहेत. हे वर्तन तिसऱ्या लाटेला आमंत्रण देईल. प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन लोकांना कोरोनाचे नियम पाळण्यास भाग पाडले पाहिजे, असे ते म्हणाले.