'या' राज्यांमध्ये का धोकादायक ठरू शकते कोरोनाची तिसरी लाट?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 08:30 AM2021-09-03T08:30:22+5:302021-09-03T08:30:56+5:30
coronavirus : ओआरएफने २७ ऑगस्टपर्यंत कोविड लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.
नवी दिल्ली : देशात कोविड लसीकरण वेगाने सुरू आहे. आतापर्यंत देशातील १६ टक्के वयस्कर लोकांना पूर्णपणे लस देण्यात आली आहे. तरीही ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कमी लसीकरण प्राणघातक ठरू शकते. तिसऱ्या लाटेच्या भीतीने अनेक राज्यांमध्ये या वयाच्या लोकांच्या लसीकरणाचे आकडे चिंतेचे कारण ठरत आहेत.
तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या जास्त आहे. ओआरएफ कोविड व्हॅक्सिन ट्रॅकरनुसार, एक हजार लोकसंख्येमागे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरणाचा आकडा खूपच कमी आहे. ओआरएफने २७ ऑगस्टपर्यंत कोविड लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.
देशात ६० वर्ष आणि त्याहून अधिक एक हजार लोकांमागे ९४७.१३ लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये हा आकडा ५२३.०५, उत्तर प्रदेश ६५१.१२ आणि पश्चिम बंगाल ८५३.४८ आहे. तिन्ही राज्यांतील या वयोगटातील लोकांची संख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १.४५ कोटी लोक आहेत, परंतु अशा एक हजार लोकांमध्ये ९५१.१२ डोस देण्यात आले आहेत. जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडे जास्त आहे.
पुढची लाट 'या' राज्यांसाठी आव्हानात्मक
तामिळनाडू आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे सरासरी लसीकरण वाढले नाही तर कोविडची पुढची लाट या राज्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. ओआरएफनुसार, २७ ऑगस्टपर्यंत ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ६१.६ टक्के लोकांना किमान एक डोस मिळाला आहे. तर ३१.४ टक्के लोकांना पूर्णपणे लस दिली आहे.
छोट्या राज्यांमधील लसीकरण
सिक्कीम, मिझोराम, लक्षद्वीप, चंदीगड आणि अंदमान आणि निकोबार सारख्या छोट्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात लसीकरण होणाऱ्या हजार लोकांमागे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या तुलनेने जास्त आहे. वृद्धांसाठी संपूर्ण लसीकरण खूप महत्वाचे आहे, कारण या वयाच्या लोकांमध्ये इतर आजारांची संख्या जास्त आहे. यामुळे हे लोक संसर्गाबद्दल खूप संवेदनशील असतात. व्हायरसच्या संसर्गापासून लस पूर्णपणे संरक्षित नसली, तरी लसीचे दोन्ही डोस घेतल्याने संसर्गाची तीव्रता आणि मृत्यूचा धोका कमी होतो, असे आढळले आहे.