Coronavirus: 'तबलिगी जमातचे 'ते' लोक नर्सेस समोरच बदलतात कपडे, करतात अश्लील कृत्ये'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 09:09 AM2020-04-03T09:09:29+5:302020-04-03T09:10:00+5:30
मध्य प्रदेशमधील इंदुर येथे गुरुवारी आरोग्य तपासणीसाठी आणि माहिती घेण्यासाठी आलेल्या वैद्यकीय स्टाफ आणि डॉक्टरांवर जमावाने हल्ला केला. देशभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मुंबई - दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील ‘आलमी मरकज’ या तब्लिग-ए-जमात’च्या मुख्यालयात झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी होऊन घरी परत गेलेल्या किमान ३७९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती विविध राज्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयास कळविण्यात आली आहे. राज्यांकडून केंद्राला कळविण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवार सकाळपर्यंत या सम्मेलनाशी संबंधित किमान १९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यापैकी नऊ तेलगंममधील ,महाराष्ट्र, दिल्ली व जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी दोन तर आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक व बिहारमधील प्रत्येकी एक मृत्यू तब्लिगशी संबंधित आहे. आता, देशभर विखुरलेल्या या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या काही नागरिकांचा पोलीस आणि वैद्यकीय स्टाफला त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य प्रदेशमधील इंदुर येथे गुरुवारी आरोग्य तपासणीसाठी आणि माहिती घेण्यासाठी आलेल्या वैद्यकीय स्टाफ आणि डॉक्टरांवर जमावाने हल्ला केला. देशभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर, हैदराबादमधील एका रुग्णालयात तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या मुस्लीम बांधवाना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, चक्क रुग्णायातही ते पुन्हा नमाज अदा करण्यासाठी एकत्र आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर, आता गाझियाबाद येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका रुग्णालयात दाखल केलेले तबलिगी जमातचे संभाव्य कोरोनाग्रस्त लोकं येथील स्टाफसोबत गैरकृत्य करत आहेत. रुग्णालयातील नर्सेस समोरच हे लोक स्वत:चे कपडे उतरत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ghaziabad: Police at MMG hospital conducting investigations into the allegations that persons from Tablighi Jamat who are in quarantine at the hospital are walking around the ward without their trousers on and making lewd gestures towards the nurses pic.twitter.com/x5Ar1Y8SEZ
— ANI UP (@ANINewsUP) April 2, 2020
कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकीकडे पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय स्टाफ जीवाचं रान करुन काम करताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्यावर हल्ले करण्यात येत असल्याच्या निंदनीय घटना घडत आहेत. गाझियाबाद येथील एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले तबलिगी जमातचे लोक येथील वैद्यकीय स्टाफसोबत गैरव्यवहार करत आहे. त्यामुळेच, त्यांना तुरुंगात दाखल करण्याचा विचार जिल्हा प्रशासनन करत आहे. रुग्णालयाचे सीएलएमएस रविंद्र राणा म्हणाले की, तबलिगी जमातचे संभाव्य कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्टाफसोबत त्यांचा व्यवहार अतिशय चुकीचा असून सातत्याने अश्लील कृत्य करत आहेत. नर्सेस समोरच आपले कपडे बदलतात, तसेच लहान-सहान गोष्टींवरुन गोंधळ घालतात, असे राणा यांनी सांगितले आहे.
२० राज्यांमध्ये परतल्याचा संशय
दरम्यान, केंद्र सरकारने अशा येथून गेलेल्या सर्वांना हुडकून ज्यांना कोरोनाची लागण झाली असेल त्यांना इस्पितळांमध्ये दाखल करण्याचे व लक्षणे न दिसणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले होते. संमेलनाला हजर राहिलेले दोन हजारांहून अधिक लोक किमान २० राज्यांमध्ये परतले असल्याचा संशय आहे. यांचा मागोवा घेण्याचे काम वेगाने सुरु आहे.