coronavirus: आठ देशांतून हजारो भारतीय परतले, १२ देशांतील १५ हजारांहून अधिक भारतीयांना १३ मेपर्यंत ६४ विशेष विमानांनी आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 02:01 AM2020-05-10T02:01:01+5:302020-05-10T02:01:35+5:30
पहिल्या टप्प्यात संयुक्त अरब अमिरातींमधून अनुक्रमे १७९ व १७७ भारतीय नागरिकांना परत घेऊन आलेली दोन विशेष विमाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चेन्नई येथे पोहोचली. त्यानंतर रविवारी पहाटेपर्यंत आणखी सात देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेली आठ विमाने मायदेशी परतली.
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे परदेशांत अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या विशेष विमानांनी व नौदलाच्या युद्धनौकांनी मायदेशी परत आणण्याच्या अनुक्रमे ‘वंदे भारत’व ‘सागरसेतू’ या मोहिमांतर्गत शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून रविवारच्या पहाटेपर्यंत आठ देशांतून हजारो नागरिकांना देशातील विविध शहरांमध्ये सुखरूपपणे परत आणण्यात आले.
याच्या पहिल्या टप्प्यात संयुक्त अरब अमिरातींमधून अनुक्रमे १७९ व १७७ भारतीय नागरिकांना परत घेऊन आलेली दोन विशेष विमाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चेन्नई येथे पोहोचली. त्यानंतर रविवारी पहाटेपर्यंत आणखी सात देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेली आठ विमाने मायदेशी परतली. या विमानांनी ढाक्याहून दिल्लीला, कुवेतहून हैदराबादला, मस्कतहून कोचीनला, शारजाहून लखनऊला, कुवेतहून कोचीनला, कुआलालंपूरहून त्रिचीला, लंडनहून मुंबईला, तर दोहाहून कोचीनला अडकलेल्या भारतीयांना आणून सोडले.
‘वंदे भारत’ मोहिमेत एकूण १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना १३ मेपर्यंत एकूण ६४ विशेष विमानांनी मायदेशी परत आणण्यात येणार आहे. त्यानंतरच्या आठवड्यात या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात कझागस्तान, उझबेगिस्तान, रशिया, जर्मनी, स्पेन व थायलंड येथील भारतीयांना परत आणले जाणार आहे.
सुरतमध्ये स्थलांतरित
मजूर पुन्हा रस्त्यावर
सुरत : राज्य सरकारकडून घरी परत जाण्याची व्यवस्था केली जात नसल्याच्या निषेधार्थ शेकडो स्थलांतरित कामगारांनी शनिवारी सुरत जिल्ह्यात हिजिरा औद्योगिकपट्ट्यातील मोरा गावी रस्त्यावर येऊन निदर्शने व दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी ३० दंगलखोर कामगारांना ताब्यात घेतले. सुरत जिल्ह्यात बिहार, उत्तर प्रदेश व ओडिशाहून आलेले हजारो स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. उद्योजकांच्या दबावाला बळी पडून राज्य सरकार घरी जाऊ इच्छिणाऱ्या या कामगारांना मुद्दाम डांबून ठेवत आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांनी केला.
२२५ बिहारी कामगारांना
तेलंगणने परत आणले
हैदराबाद : होळीसाठी घरी गेलेल्या; परंतु ‘लॉकडाऊन’मुळे तेथेच अडकून पडलेल्या बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील २२५ कामगारांना तेलंगण सरकारने विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाडीची सोय करून राज्यात परत आणले. या सर्व कामगारांचे प्रवासाचे भाडे तेलंगण सरकारने भरले. बिहारहून आलेल्या रेल्वेतून हे कामगार लिंगमपल्ली स्टेशनवर उतरले तेव्हा नागरी पुरवठामंत्री गंगुला कमलाकर यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. हे कामगार गेली अनेक वर्षे तेलंगणमधील भात सडण्याच्या गिरण्यांमध्ये काम करणारे आहेत. अशाच प्रकारे इतर राज्यांमधूनही कामगारांना तेलंगणमध्ये सन्मानाने परत आणले जाईल, असे तेलंगण राष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष पल्ला राजेश्वर रेड्डी यांनी सांगितले.