Coronavirus: दाहकता! गर्दीमुळं टोकन घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार; मध्यरात्रीपर्यंत पाहावी लागतेय वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 12:25 PM2021-04-21T12:25:41+5:302021-04-21T12:26:04+5:30
कर्नाटकच्या होसापल्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी टोकन घेऊन वाट पाहावी लागत आहे. दिवसभर रांगेत वाट पाहून मध्यरात्री अंत्यसंस्कार केले जात आहेत.
बंगळुरू – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे तर मृतांचा आकडाही वाढत आहे. गुजरातपाठोपाठ कर्नाटकमधूनही एक ह्दयद्रावक घटना समोर येत आहे. कोरोना संक्रमणामुळं मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात स्मशानभूमी बाहेर रांगा लावल्या जात असल्याचं दिसून येत आहे. इतकचं नाही तर याठिकाणी होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आता टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे.
कर्नाटकच्या होसापल्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी टोकन घेऊन वाट पाहावी लागत आहे. दिवसभर रांगेत वाट पाहून मध्यरात्री अंत्यसंस्कार केले जात आहेत. मृतदेहांना घेऊन नातेवाईक टोकनमध्ये वाट पाहत आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याशिवाय ६ रुग्णवाहिकेतील मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रांगेत होते. स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, याठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी दोन चिता आहेत. सोमवारी ३१ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगळवारी सकाळी ५ पर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. चंद्रकुमार सांगतात की, ऑक्टोबर २०२० पर्यंत याठिकाणी कोरोनाचे १ किंवा २ मृतदेह दिवसभरात येत होते. परंतु मागील काही दिवसांपासून याठिकाणी मृतदेहांची संख्या वाढली. त्यासाठी आता टोकन पद्धत सुरू केली आहे. बंगळुरूमध्ये कोरोनाची दुसरी लाटेने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. हॉस्पिटलमध्ये अचानक वाढणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. १९ एप्रिलला राज्यात ९७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या१,५६,१६,१३० वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (२१ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत२,९५,०४१ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख ८२ हजारांवर पोहोचला आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत १२,७१, ००,००० हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही १.१८ टक्के इतका कमी झाला आहे.