coronavirus: रेल्वे सुरू; पण राज्यांतील परिवहन सेवा ठप्पच, प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:10 AM2020-05-12T05:10:46+5:302020-05-12T05:11:44+5:30
श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे सतत सुरू आहेत. यात वाढही होत आहे. या रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहेत. प्रवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी वाहन मिळत नाही. अनेक ठिकाणी प्रवासी पायीच आपल्या घरी निघाले आहेत.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयाच्या सूचनेवरून रेल्वेने १२ मेपासून रितसर रेल्वे सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे; पण दुसरीकडे राज्यांमध्ये सार्वजनिक परिवहन सेवा आणि कॅब सेवा बंद असल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढू शकतात. अनेक राज्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला असे सांगितले आहे की, रेल्वे चालविण्याचा निर्णय घेत असाल, तर त्यासोबतच परिवहन सेवा आणि कॅब सेवा सुरूकरण्याचा निर्णयही घ्यायला हवा. असे केले नाही तर रेल्वे स्टेशनवर गोंधळ वाढू शकतो.
श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे सतत सुरू आहेत. यात वाढही होत आहे. या रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहेत. प्रवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी वाहन मिळत नाही. अनेक ठिकाणी प्रवासी पायीच आपल्या घरी निघाले आहेत. काही जण मालवाहतुकीच्या वाहनाने प्रवास करीत आहेत. पूर्व आणि उत्तर भागातील राज्यांंत ही समस्या अधिक आहे. येथे ५ कि.मी.साठी प्रवाशांकडून ४०० ते ५०० आणि अनेक ठिकाणी १००० रुपयांपर्यंत वसुली केली जात आहे. दुसरीकडे प्रवासी श्रमिक एक्स्प्रेसमध्ये आपल्या राज्यात जाण्यासाठी ५०० रुपयांपर्यंत भाडे चुकते करीत आहेत. त्यामुळे रेल्वेसोबतच इतर परिवहन सेवाही सुरू करण्यात यावी, अशी सूचना बिहारने केंद्र सरकारला केली आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी सहकार्य करा -केंद्राचे निर्देश
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या दिवसांत सर्व वैद्यकीय व्यावसायिक, निमवैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता व सफाई कामगारवर्ग आणि रुग्णवाहिकांचे येणे-जाणे सहजपणे होईल याची काळजी घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे.
यांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध असतील, तर कोरोनाबाधित व इतर रुग्णांवर उपचार करणे व वैद्यकीय सेवा देणे कठीण होईल, असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी पत्रात म्हटले. सगळे खासगी दवाखाने, नर्सिंग होम्स आणि प्रयोगशाळा वैद्यकीय व्यावसायिक व कर्मचाºयांसह खुल्या राहतील हे पाहावे, असे सांगून पत्रात म्हटले आहे, खासगी दवाखाने आणि नर्सिंग होम्स सुरू ठेवल्यास नियमित वैद्यकीय सेवांवरील ताण कमी होईल.