CoronaVirus १ लाख ३४ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 05:07 AM2020-04-05T05:07:49+5:302020-04-05T05:08:22+5:30
३१ हजार डॉक्टरांचा पुढाकार । ३० टक्के रुग्ण तबलिगींशी संबधित
नवी दिल्ली : कोरोनाच्या लढ्यासाठी भारत क्षणोक्षणी सुसज्ज होत आहे. गेल्या १५ दिवसांत आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेनुसार विविध राज्यांनी १ लाख ३४ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे तर ३१ हजार निवृत्त, खासगी डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने मदतीची तयारी दाखवली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली.
एअर इंडिया व खासगी ९७ विमानांच्या मदतीने ईशान्येकडील राज्यांसह संपूर्ण देशभर १९० टन साहित्य पोहोचवण्यात आले. त्यात वैद्यकीय उपकरणे, मास्क, औषधी तसेच व्हेंटीलेटरचा समावेश आहे. रुग्णसंख्या वाढल्यास काय करावे, आरोग्य व्यवस्थापन कसे असेल, यावर प्रशिक्षणात भर देण्यात आला होता, असेही अगरवाल
म्हणाले.
एखाद्या संसर्गजन्य आजाराशी दररोज संघर्ष करावा लागतो. त्यामुळे निझामुद्दीन मरकजमध्ये भाग घेतलेल्या व त्यांच्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहोचलो, असे आज म्हणता येणार नाही. १७ राज्यांमध्ये युद्धपातळीवर सर्वांचा शोध घेतला जात आहे. १०२३ रूग्ण निझामुद्दीन तबलिगी मरकजमध्ये भाग घेतलेले किंवा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत हा आकडा ३० टक्के आहे. सर्व विकसित देशांप्रमाणे भारतानेदेखील चाचणीची क्षमता हळूहळू वाढवली. एकूण ७५ हजार नमुने आतापर्यंत तापसण्यात आले आहेत. १०० पेक्षा जास्त सरकारी व खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी होत आहे, अशी माहितीही लव अगरवाल यांनी दिली.
१७ राज्ये २२ हजार क्वारंटाईन
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव पत्रकार परिषदेत म्हणाल्या, निजामुद्दीन तबलिगी मरकजमध्ये सहभागी झालेले व त्यांच्या संपर्कातील २२ हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु अद्यापही काही जणांपर्यंत सरकारी यंत्रणा पोहोचू न शकल्याची शक्यता आहे.
गृह मंत्रालयाच्या हेल्पलाईनवर अहोरात्र २०० जण काम करीत आहेत. प्रत्येक राज्याशी संपर्क साधला जातो. त्यामुळे गावागावांत सज्जता वाढते आहे. एसडीआरएफ निधीसाठी केंद्राने ११९२ कोटी रुपये दिले आहेत.