CoronaVirus: गोवा, मणिपूरपाठोपाठ त्रिपुराही संसर्गमुक्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:42 AM2020-04-25T04:42:02+5:302020-04-25T06:56:29+5:30
दोन्ही रुग्ण झाले पूर्णपणे बरे; मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांची घोषणा, तरीही लॉकडाऊनचे काटेकोर पालन करणार
आगरतळा : गोवा व मणिपूर ही राज्ये काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गापासून मुक्त झाल्यानंतर त्रिपुरानेही आता हे यश मिळविले आहे. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
त्रिपुरामध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेले दोन रुग्ण आढळून आले होते. पहिल्या रुग्णावरील उपचारांनंतर केलेल्या वैद्यकीय चाचणीत तो संसर्गमुक्त झाल्याचे दिसले होते. आता दुसऱ्या रुग्णाच्या वैद्यकीय चाचणी अहवालातही हाच निष्कर्ष काढण्यात आला आहे.
मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी म्हटले आहे की, त्रिपुरा कोरोना विषाणूमुक्त झाले असले तरी जनतेने लॉकडाऊनच्या निर्बंधांचे यापुढेही काटेकोर पालन केले पाहिजे. कोरोना विषाणूपासून होणाºया ‘कोविड-१९’ या रोगाची साथ पुन्हा पसरू नये, म्हणून प्रत्येकाने फिजिकल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे.
महत्त्वाचे कारण नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. जनतेने आतापर्यंत ही दक्षता घेतल्यामुळेच त्रिपुरा कोरोनापासून मुक्त झाला आहे. तशीच स्थिती यापुढेही कायम ठेवायची आहे. त्रिपुरातील कोरोनाचा पहिला रुग्ण ही एक महिला होती. गोमती जिल्ह्यातील
उदयपूर या गावी राहणारी ही महिला लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी गुवाहाटी येथून त्रिपुरामध्ये परतली होती. तिला कोरोनाची बाधा झाल्याचे सहा एप्रिलला आलेल्या वैद्यकीय चाचणीच्या अहवालातून सिद्ध झाले होते. त्रिपुरामध्ये सध्या कोरोनाच्या १११ संशयित रुग्णांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे, तर २२२ जणांना त्यांच्या घरातच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
दोन्ही रुग्ण उपचारानंतर बरे झाले
त्रिपुरा हे कोरोना विषाणूमुक्त झालेले देशातील तिसरे राज्य आहे. याआधी गोव्याने ही कामगिरी फत्ते केली होती. गोव्यात कोरोनाचे सात रुग्ण होते. त्यातील ६ जण दुसºया प्रांतात प्रवास करून राज्यात परतले होते. तर एकाला त्याच्या भावापासूनच बाधा झाली होती. गोवा ३ एप्रिल रोजी संसर्गापासून मुक्त झाले. त्यापाठोपाठ मणिपूर कोरोनामुक्त झाले. तिथे असलेले या आजाराचे दोन रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले.