Coronavirus: घरातूनच दिवे लावा... मोदींच्या घोषणेनंतर दिग्गजांचा सोशल मीडियातून सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 01:11 PM2020-04-03T13:11:41+5:302020-04-03T13:12:16+5:30
शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील लाईट्स बंद करण्यास सांगितले. त्याचसोबत घराच्या दरवाजात, बालकनीत उभं राहून ९ मिनिटे मेणबत्ती
मुंबई - कोरोनाविरुद्ध लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सामूहिक शक्तीचं दर्शन दाखवण्याचं आवाहन केले आहे. देशात कोरोनाच्या संकटात लढताना कोणालाही आपण एकटे आहोत असं वाटू नये यासाठी मोदींनी लोकांना व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. ५ एप्रिल रात्री ९ वाजून ९ मिनिटांसाठी देशात प्रकाशाचा तेज निर्माण करा यामुळे १३० कोटी जनतेची महाशक्ती या संकटाविरोधात एकवटली आहे हे दिसून येईल असं सांगितले. मात्र, पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर पुन्हा ती चूक न करण्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे दिग्गज कलाकार आणि क्रिकेटर्संनेही घरात बसून दिवे लावा... असं संदेश आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिला आहे.
शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील लाईट्स बंद करण्यास सांगितले. त्याचसोबत घराच्या दरवाजात, बालकनीत उभं राहून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवा, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅशलाईट लावण्याचं आवाहन केले. त्यामुळे चारही दिशांना प्रत्येक व्यक्ती दिवा लावेल त्या प्रकाशातून महाशक्तीचं रुप दिसेल. याचा अर्थ असा की, कोरोना संकटाचा मुकाबला कोणी एकटा करत नाही तर सामूहिकपणे आपण या लढाईत उतरलो आहे असं मोदी म्हणाले. मात्र, हे आवाहन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगायलाही विसरले नाहीत की, याचं कोणतंही आयोजन करु नका, कोणत्याही रस्त्यावर, गल्लीबोळात एकत्र जमू नका, फक्त घरातील दरवाजा, बालकनी याचठिकाणी हे करायचं आहे. सोशल डिस्टेंसिगची लक्ष्मण रेषा पार करु नका, कोणत्याही स्थितीत सोशल डिस्टेंसिंगचा नियम तोडू नये हाच रामबाण उपाय आहे असं ते म्हणाले.
मोदींच्या या घोषणेचं समर्थन करत अनेकांनी, रस्त्यावर उतरणाऱ्या आणि संकल्पनेचा इव्हेंट करणाऱ्या नागरिकांना मोलाचा आणि सबुरीचा सल्ला दिला आहे. देशातील प्रत्येक व्यक्तींनी घरीच थांबायचे आहे, आम्हाला आपल्या संघाच्या कर्णधारावर पूर्णपणे विश्वास आहे. कृपया कुणीही रस्त्यावर येऊन इव्हेंट करु नका, घरी राहूनच सर्वांनी मोदींच्या सूचनेचं पालन करावे, असे हरभजन सिंगने म्हटले आहे.
every individual hs his own part to do 2 stay home.We r proud of our Team Leader @narendramodi Let’s all continue to Stay home & be Safe.5th April at 9pm for 9 mins all lights off.Candles,Diya,torch,mobile flash to use bt only from https://t.co/zRJULJmaHr Streets Show Please 🙏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 3, 2020
तसेच, सोशल मीडिया, फेसबुक आणि ट्विटरवरुनही अनेकांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केलं आहे. घरातूनच दिवे लावावे, असे सांगितले आहे. कुणीही मेणबत्ती घेऊन रस्त्यावर येऊ नये, असे आवाहनच लोकांनी केले आहे. दरम्यान, मोदींच्या या आवाहनानंतर दिग्दर्शक फराह खान यांनी ट्विट करुन, देशाच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली त्यावेळी त्यांनी २९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता लोकांना थाळी, टाळी आणि घंटानाद करुन आरोग्य कर्मचारी जे कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन केलं होतं तेव्हा मोदींच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु त्यावेळी काही लोकांनी घराबाहेर पडून, रस्त्यावर एकत्र जमून थाळीनाद, रॅली काढून सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांना हरताळ फासला. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे लॉकडाऊन उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता याबाबत खबरदारी घेतल्याचं दिसून आलं.