coronavirus: दिल्लीत दररोज कोरोनाच्या दोन हजारांवर नवीन रुग्णांची पडतेय भर, दोन दिवसांत संख्या लाखावर जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 03:47 AM2020-07-05T03:47:54+5:302020-07-05T06:50:17+5:30
डॉ. महेश वर्मा समितीने दिलेल्या अहवालानुसार जुलै अखेरपर्यंत दिल्लीत रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात जाणार असल्याचे नोंदविण्यात आले होते. प
नवी दिल्ली : दिल्लीत कोविड - १९ ची तपासणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र त्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या वाढत नसल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करीत असले तरी दररोज दोन ते अडीच हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे, हे येथील वास्तव आहे.
डॉ. महेश वर्मा समितीने दिलेल्या अहवालानुसार जुलै अखेरपर्यंत दिल्लीत रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात जाणार असल्याचे नोंदविण्यात आले होते. परंतु केजरीवाल यांनी केंद्र सरकार सोबत नियोजन करून कोविड - १९ ला समर्पित रुग्णांलयात बेडची संख्या वाढविण्यात आली. पंचतारांकित हॉटेल्स खासगी रुग्णालयांना जोडण्यात आलीत. १३५०० बेड कोविड- रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेत. त्यात हॉटेमधील बेडची संख्या ३५०० हजार झाली आहे. दिल्ली सरकारच्या रुग्णालयातील चार हजार बेडसवर आॅक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे रुग्ण बरे झाले आहेत व दुरुस्त होऊन किमान १४ दिवस झाले असतील आणि ज्यांचे वय १४ ते ६० पर्यंत असेल त्यांनी प्लाझ्मा दान करावा असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.
आज दिल्ली कोविड - १९ चा सामना करण्यासाठी सज्ज आहे. दिल्लीत मोठ्याप्रमाणात तपासण्या सुरू आहेत; परंतु दररोज २ हजारांवर नवीन रुग्णांची भर पडत आहे.
24 तासांत दिल्लीत २५२० नवीन रुग्णांची भर पडली. गेले काही दिवस दिल्लीत दररोज २ ते ३ हजार नवीन रुग्ण नोंदविले जातात. शनिवारी सकाळपर्यंत कोविड-१९ रुग्णांची एकूण संख्या ९४,६९५ नोंदविण्यात आली आहे.
65,624
रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २६ हजार १४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
2924
दिल्लीत आतापर्यंत रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी होत असल्याच दावा केजरीवाल यांनी केला आहे.