CoronaVirus: कोटा येथे अडकले राज्यातील दोन हजार विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:48 AM2020-04-25T04:48:37+5:302020-04-25T04:49:37+5:30
सुटकेसाठी लोकप्रतिनिधींशी संपर्क; स्पर्धा परीक्षेसाठी गेले, लॉकडाउनमुळे रखडले
मुंबई : आयआयटी, मेडिकलसारख्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवेश परीक्षेच्या अभ्यासासाठी राजस्थानातील कोटा येथे गेलेले राज्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थी लॉकडाउनमुळे तेथेच अडकून पडले आहेत. तेथे त्यांची गैरसोय होत असून महाराष्ट्रात येण्यासाठी ते आपापल्या विभागातील आमदार, खासदारांकडे पाठपुरावा करत असून त्यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
लॉकडाउन लांबल्यानंतर केंद्र सरकारने राजस्थान सरकारला जे राज्य त्यांच्या विद्यार्थ्यांना परत नेण्याची इच्छा दर्शवित आहेत त्यांना परवानगी द्यावी अशी सूचना केली होती. त्यानुसार राजस्थान सरकारने सहकार्यही केले. यामुळे उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना विशेष बसगाड्यांनी स्वगृही आणले. मात्र राज्यातील विद्यार्थी अजूनही तेथे अडकले आहेत.
काही विद्यार्थी हॉस्टेलमध्ये तर, काही पेर्इंगगेस्ट म्हणून राहात आहेत. राजस्थान सरकारकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत असली तरी त्यासाठी विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. यामुळे लवकरात लवकर आमची सुटका करावी, इतर राज्यातील सरकारने त्यांच्या विद्यार्थ्यांना परत नेले. त्यामुळे आम्हालाही सरकारने महाराष्ट्रात परत नेण्याची व्यवस्था करावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
सरकार प्रयत्नशील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधला आहे. दोन्ही सरकार मिळून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यात येईल असे टिष्ट्वट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विद्यार्थ्यांना राज्यात आणण्याची सोय करावी असे टिष्ट्वट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.