CoronaVirus : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी होणार बैठक, लॉकडाऊनवर चर्चा होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:50 PM2020-04-15T13:50:50+5:302020-04-15T13:56:34+5:30
CoronaVirus : नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि. १४) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविणार असल्याचे सांगितले. याशिवाय, २० एप्रिलपासून ज्याठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट नाही, ते ठिकाण एका नियमावलीनुसार लॉकडाऊनमधून वगळण्याची शक्यता नरेंद्र मोदी यांनी वर्तविली होती.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, सब यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नियमावलीनुसार, सर्व आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहे.
याचबरोबर, केंद्र सरकारने या नियमावलीमधून रुग्णालये, किराणा दुकान, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी या सर्वांना सवलती दिल्या आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क घालणे सुद्धा अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करणार येईल, असे या नियमावलीत म्हटले आहे.