CoronaVirus : मोदी सरकार पाठवणार प. बंगालमध्ये टीम; ममता म्हणाल्या, नो एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 09:15 PM2020-04-20T21:15:39+5:302020-04-20T21:16:12+5:30
केंद्राच्या या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
कोलकाताः कोरोना व्हायरसनं अख्ख्या जगाला संकटात टाकलं आहे. भारतातील अनेक राज्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार या आपत्तीचा सामना करत आहेत. या आपत्तीच्या काळातही राजकारण सुरूच आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालसह काही राज्यांत आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीम (आयएमसीटी) पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ही टीम राज्यांतील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनदरम्याच्या उल्लंघनाच्या तक्रारींबद्दल आपला अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द करणार आहे. परंतु केंद्राच्या या निर्णयाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
ममता यांनी सोमवारी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या टीमना राज्यांत पाठवण्यामागील स्पष्ट कारण त्यांनी मोदी सरकारला विचारले. ममतांनी लिहिले, 'कोरोना साथीच्या विरोधात केंद्र सरकारचा पाठिंबा आणि सूचनांचे आम्ही स्वागत करतो. पण पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांमध्ये आयएमसीटी पाठविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय समजण्यापलीकडचा आहे.
मोदी सरकार कोरोनाबाधित राज्यांमध्ये पाठवणार केंद्रीय टीम
केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये दोन आयएमसीटी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या टीममध्ये केंद्राच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमधील अधिकारी व मंत्री असतील. ही टीम कोरोनाविरुद्ध राज्याची तयारी आणि मुख्यत्वे लॉकडाऊनच्या काळातील आढावा घेईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "ही टीम लोकहितासाठीच्या परिस्थितीचे मूल्यांकन करेल, राज्य सरकारांना निर्देश देतील आणि त्यांचे अहवाल केंद्र सरकारला पाठवतील."