coronavirus: अंधाऱ्या खोलीत नेऊन पट्ट्याने कसं मारतात हे मला माहीत आहे, मोदी सरकारमधील मंत्र्याची अधिकाऱ्यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:27 PM2020-05-25T13:27:11+5:302020-05-25T13:28:31+5:30
आतापर्यंत काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी प्रमाणात दिसून येत होता. पण आता छत्तीसगडसारख्या राज्यांमध्येही कोरोनाचे संकट आता गंभीर रूप धारण करत आहे.
रायपूर - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशासमोर निर्माण झालेले आव्हान दिवसेंदविस अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. मात्र आतापर्यंत काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी प्रमाणात दिसून येत होता. पण आता छत्तीसगडसारख्या राज्यांमध्येही कोरोनाचे संकट आता गंभीर रूप धारण करत आहे. दरम्यान, कोरोनाचे आव्हान उभे असतानाच मोदी सरकारमधील एका मंत्र्याने क्वारेंटाईन सेंटरमध्ये जात दोन अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी छत्तीसगडमधील बलरामपूर येथील क्वारेंटाईन सेंटरला भेट दिली. त्यानंतर तिथे गेल्यावर त्यांनी क्वारेंटाईन सेंटरमधील अधिकाऱ्यांना धमकी दिली. अंधाऱ्या खोलीत नेऊन बेल्टने कसे मारतात, हे मला माहित आहे, अशी धमकी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, त्यांनी दिलेल्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
केंद्रीय मंत्री रेणुका सिंह बलरामपूर येथील क्वारेंटाईन सेंटरची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी अधिकाऱ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, इथे दादागिरी चालणार नाही. इथे आमचं सरकार नाही, असं कुठल्या अधिकाऱ्याने समजू नये. आम्ही १५ वर्षे सरकार चालवले आहे. आम्ही राज्यातून उपासमार, नक्षलवाद आणि निरक्षरतेला पळवून लावले आहे. या राज्यात आम्ही विकास केला आहे. भारत सरकारकडे पैसे आणि इच्छाशक्तीची कुठलीही कमतरता नाही आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना कमकुवत समजू नका. तुम्ही भाजपा कार्यकर्त्यांसोबत जो भेदभाव करताय तो विसरा, अंधाऱ्या खोलीत नेऊन पट्ट्याने कसे मारतात हे मला ठावूक आहे, अशी धमकी त्यांनी दिली.
छत्तीसगडमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे २५२ रुग्ण सापडले आहेत. पैकी ६७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १८५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर छत्तीसगडमध्ये आतापर्यंत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.